सरकारने राज्यात ४५ वर्षे वया पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणात प्राधान्य देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र असे असले तरी कोव्हॅक्सिन लसीचा मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा तुटवडा आहे. त्यामुळे या लसीचा डोस केंद्रावर आल्याची माहिती मिळताच नागरिक लसीसाठी थेट रस्त्यावरच मुक्काम ठोकत आहेत.
श्रीरामपूर शहरामध्ये पूर्वी ग्रामीण रुग्णालय तसेच दोन खासगी रुग्णालयांमध्ये या लसीचा पुरवठा केला जात होता. आता मात्र शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयातील आझाद मैदानात लसीकरण केंद्र हलविण्यात आले आहे. केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिक थेट रस्त्यावर तर काहीजण चक्क कारमध्ये रांगेत मुक्कामी आल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी चालू होणाऱ्या लसीकरणासाठी नागरिक आदल्या दिवशी रात्री नऊ वाजेपासून रांगा लागत आहेत.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले तालुक्यांमध्ये अद्यापही १५ हजार ज्येष्ठ नागरिक कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र लसीचा केवळ दीडशे ते दोनशे कुपींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरण रखडले आहे.
-----
पहिल्या डोसला ६० दिवस पूर्ण
दरम्यान, अनेक नागरिकांच्या पहिल्या डोसला आता ६० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घ्यायचा अथवा नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढविण्यात आले असले तरी कोव्हॅक्सिनबाबत मात्र अद्यापपर्यंत आरोग्य विभागाने कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.
----
मी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन ६० दिवस पूर्ण झाले आहेत. अनेकदा केंद्रावर जाऊनही मला पुरेशा पुरवठ्याआभावी लस मिळू शकली नाही. त्यामुळे आता लस घ्यावी का नाही असा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
-युवराज जगताप,
कारेगाव, ज्येष्ठ नागरिक.