अहमदनगर : नगर शहराला केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजनेतून लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वसंत टेकडी येथील अमृत योजनेमधून ५० लाख लिटर साठवण टाकीचे काम पूर्ण झाले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शनिवारी (दि. १९) पाईपलाईनच्या कामाची पाहणी करून सूचना केल्या.
नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो. विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडीपर्यंतच्या योजनेच्या कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे वसंत टेकडी येथील जुनी ६७ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार असून पाण्याची गळती बंद होऊन पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
अमृत योजनेच्या कामातील अंतिम टप्प्यातील जोडणी काम हाती घेतले असून, त्या कामाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे, जल अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते, इंजिनिअर गणेश गाडळकर, ठेकेदार दयानंद पानसे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढील आठ दिवसात मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनपर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. मुळा धरण ते नगर शहर असे एकूण ३४ किलोमीटरपर्यंतचे अमृत पाणी योजनेचे काम सुरू आहे. पुढील काही दिवसात विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यंतच्या पाईपलाईनचे कामही पूर्ण होणार आहे. अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहराला फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
....................
वाढीव ४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार
सध्या नगर शहराला ७३ दशलक्ष लिटर पाणी मिळत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ११७ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. म्हणजेच ४० दशलक्ष लिटर पाणी जास्त वापरास उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
.................
या होत्या समस्या
या अमृत पाणी योजनेच्या कामांमध्ये विविध अडचणी आल्या होत्या. यामध्ये शेतकरी, भूसंपादन, वन विभाग, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्या हद्दीतून पाईपलाईनचे काम होणार होते. त्यामुळे संबंधित विभागांची परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु आता त्या अडचणी पूर्णपणे निकाली लागल्या आहेत. त्यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील दिवसात अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण होणार आहे.
.............
१९ बाबासाहेब वाकळे