पारनेर : ‘तुम्ही मला बारा ते पंधरा वर्षे पारनेर साखर कारखाना चालविण्यास द्या, मी इॅथेनॉल प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प राबवतो व बारा वर्षांत कारखाना कर्जमुक्त करून सभासदांच्या ताब्यात देतो, असे स्वप्न शेवटपर्यंत भाजपाचे नेते व दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे होते, परंतु वेळोवेळी राज्य बँकेने आडकाठी आणल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. सन २००२ पासून बंद असलेला पारनेर साखर कारखाना राज्य बँकेने सन २००५ मध्ये भाडेतत्वावर चालविण्यासाठी निविदा काढल्यावर गोपीनाथ मुंडे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार विजय औटी, भाजपाचे साहेबराव मोरे, कृष्णाजी बडवे, कामगार नेते कॉ. कै.मधुकर कात्रे, निवृत्ती मते, शिवाजी मापारी व कामगारांच्या आग्रहाखातर ‘वैद्यनाथ’ मार्फत चालविण्यास घेतला. त्यांनी कारखाना चालविण्यास घेतल्यावर गेल्या अनेक वर्षांपासुनचे सुमारे चारशे ते पाचशे कामगारांच्या बंद झालेल्या संसाराच्या चुली सुरू झाल्या व शेतकर्यांच्या उसालाही किंमत मिळू लागल्याने सुमारे पाच ते सहा कोटीचे अर्थचक्र तालुक्यात फिरले. कामगारांच्या मुलांची बंद झालेली शिक्षणे व इतर सुविधा पैसा हातात आल्याने पुन्हा सुरू झाल्या होत्या. सन २०११ पर्यंत मुंडे यांनी कारखाना चालविला. कारखाना सहा वर्षे चालविल्यानंतर त्यांनी राज्य बँकेकडे ‘पारनेर’ मला बारा ते पंधरा वर्षे चालविण्यास द्या, मी इथेनॉल प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प सुरू करून पारनेर कर्जमुक्त करुन सभासदांच्या ताब्यात देतो, असे मुंडे अनेकदा म्हटले होते. कारखान्यावर भाषणातही त्यांनी तसे सांगितले होते. ‘लोकमत’ शी थेट बोलताना प्रथम हाच मुद्दा ते मांडत असत. राज्य बँकेने मात्र त्यानंतर अवघी दोन वर्षे, तीन वर्षे निविदा काढल्याने त्यांनी सहभाग घेतला नाही. तरीही मुंडे यांचे ‘पारनेर’ कडे लक्ष होते. त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक म्हणून काम करणारे अश्विनकुमार घोळवे, कामगार नेते निवृत्ती मते, तुकाराम बेलोटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी बडवे, गोविंद बडवे, शिवाजी मापारी यांच्यासह अनेकांना त्यांच्या पारनेरमधील आठवणींना उजाळा देताना अश्रुंचा बांध फुटला होता. (तालुका प्रतिनिधी)पारनेर साखर कारखाना आधी भाडेतत्वावर देण्याची निविदा निघाल्यानंतर ‘लोकमत’ने गोपीनाथ मुंडे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी ‘अरे राज्य बँकेला पारनेर कारखाना विकायचा रे’ असे सांगितले होते. व नंतर दोन महिन्यातच ‘पारनेर’ च्या विक्रीची निविदा निघाली.एवढे मुंडे पारनेर विषयी जागरूक असत.
मुंडेंचे ‘ते’ स्वप्न अधुरेच
By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST