माळवाडगाव येथील आडत व्यापारी रमेश मुथ्था, गणेश मुथ्था, भूषण मुथ्था व चंदन मुथ्था यांचे तेथे भुसार खरेदी केंद्र होते. शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मका, तसेच इतर धान्यांची त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. त्याबदल्यात शेतकऱ्यांना धनादेश दिले होते. मात्र ते बँकेत वटले नाहीत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांना वाढीव दरावर भुसाराची विक्री करून बँक खात्यांवर पैसे टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच मुथ्था बंधूंनी ६ फेब्रुवारी रोजी येथून कुटुंबासह धूम ठोकली. शेतकऱ्यांची पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्यांच्याकडे असल्याचे समजते.
पीडित शेतकऱ्यांनी माळवाडगाव येथे नुकतीच बैठक घेतली. त्यात शेतकरी संघर्ष कृती समितीची स्थापना करण्यात आली. फरार व्यापाऱ्यांच्या शोधासाठी यावेळी इनाम जाहीर करण्यात आला. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान, उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्यासह पोलीस पथक औरंगाबाद,जालना, मालेगाव, मुंबई, टिटवाला येथे शोध घेण्यासाठी गेले होते. मात्र व्यापाऱ्यांचे कोणतेही धागेदोरे मिळाले नाही. या व्यापाऱ्यांवर तालुका पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
-----------
व्यापारी बोराचा शोध नाही
शहरातील अन्य एक व्यापारी नवल बोरा याने वडाळा महादेव, शिरसगावसह अन्य गावातील काही शेतकऱ्यांचे भुसाराचे पैसे थकवून पळ काढला. त्या घटनेसही एक महिना उलटून गेला आहे. मात्र शहर पोलिसांना बोरा मिळून आलेला नाही. शेतकऱ्यांचे १० लाख रुपयांहून अधिक पैसे बोराकडे थकीत असून याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------