अहमदनगर : कार्यकारिणीतून डावलण्यात आल्याने मनसेचे स्थायी समिती सभापतींसह नगरसेवक सेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त फेसबुकवर झळकले आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली़ मात्र सभापती डागवाले यांनी फेसबुकवरील वृत्ताचा इन्कार केला आहे़ कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने त्यांच्याकडून सेना प्रवेशाची चर्चा घडवून आणली जात असल्याचे समजते़मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगर कार्यकारिणीत नुकतेच फेरबदल केले़जिल्हा संघटक पद त्यांनी गोठविले़ जिल्हासंघटक म्हणून सचिन डफळ कार्यरत होते़ डफळ यांची नवीन कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली़ ज्येष्ठ नेते वसंत लोढा व संजय झिंजे यांनाही पदे देण्यात आली आहेत़ शहराध्यक्ष पदावर नगरसेवकातून एकाची वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती़ परंतु नगरसेवकांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नाही़ त्यामुळे नगरसेवकांतून नाराजी व्यक्त होत होती़ पण त्यांनी कार्यकारिणीविषयी कोणतीही प्रक्रिया दिली नाही़ कारण पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असे आदेश दस्तूर खुद्द राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या मेळाव्यात दिले आहेत़ त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत कुणीही प्रतिक्रिया दिली नाही़ उघडपणे त्यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी सभापती डागवाले यांच्यासह नगरसेवक सेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त फेसबुकवर झळकले़ नाराजांचे हे दबावतंत्र असल्याची चर्चा शहरात सुरू होती़ मनसेत महापालिका निवडणुकीपासून दोन गट सक्रिय झाले आहेत़ नगरसेवक विरुध्द पदाधिकारी, असा वाद आहे़ या वादामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली़ नव्या कार्यकारणीत नगरसेवकांना संधी देण्यात आली नाही़ त्यामुळे नगरसेवकांसह माजी शहर व जिल्हा अध्यक्ष अस्वस्थ आहेत़ पक्षात मानाचे पद न मिळाल्याने हा गट नाराज झाला आहे़ त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने कार्यकारणीला महत्व येणार आहे़ त्यामुळे नवीन कार्यकारणीत स्थान आवश्यक होते़ पण एकाही नगरसेवकाला स्थान न मिळाल्याने नाराजांना इतर पक्षांकडून गळ घालण्याचा प्रयत्न सुरू असतानाच फेसबुकर हा मजकूर प्रसिध्द झाला. (प्रतिनिधी)फेसबुकरील माहितीत तथ्य नाही़ कोणीही इतर पक्षात जाणार नसून, सर्व मनसेतच राहतील़ याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही आणि बैठकही नाही़ त्यामुळे चर्चेत काहीच तथ्य नाही़-किशोर डागवाले, सभापती, स्थायी समिती.
मनसे नगरसेवकांचे ‘सोशल’ दबावतंत्र
By admin | Updated: June 22, 2014 00:20 IST