श्रीरामपूर : तालुक्यातील गोदाकाठच्या कमालपूर शिवारातील बाळासाहेब भाऊसाहेब गोरे या शेतकऱ्याच्या मालकीचा साडेतीन एकर ऊस ठिबक सिंचनासह जळून खाक झाला. महावितरणच्या विजेच्या खांबावरील तार तुटल्याने शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कमालपूर शिवारातील घुमनदेव रस्त्यावर गोरे या प्रगतिशील शेतकऱ्याचे उसाचे पीक आहे. त्यांच्या शेतातून घोगरगावकडे मुख्य वीज वाहिनी जाते. शनिवारी सायंकाळी वादळ वारे नसताना या वाहिनीची तार अचानक खांबावरून निखळून पडली. त्यामुळे मोठा जाळ झाला. यात खांबावरील लोखंडी पट्ट्यादेखील वितळल्या. काही क्षणातच ठिणग्या उसावर पडून शेतातील उसाने पेट घेतला. त्यामुळे आगडोंब झाला. परिसरातील शेतकरी मदतीला धावले; परंतु उपयोग झाला नाही. अवघ्या पंधरा दिवसांवर हा ऊस तोडणीसाठी आलेला होता. अशोक साखर कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत संपूर्ण साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला होता. ठिबक सिंचनही खाक झाल्याने गोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणच्या भोकर उपकेंद्रावरील सहायक अभियंत्यांनी घटनास्थळी भेट दिली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांनीही गोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.
विजेच्या मुख्य वाहिनीची तार तुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST