अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांनी सुरक्षेच्या कारणास्तव देवस्थानकडे असणारे सुवर्ण अलंकार पंचांसमक्ष वितळविले आहेत. या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले. यातून २५ किलो चांदीची वीट, २५ तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट अन् ५ तोळ्याचा मुकुट तयार करून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सचिन मरकड आणि कोषाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी दिली. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले की, सध्या उन्हाळ्याच्या सुट्यांचा कालावधी सुरू आहे. यामुळे श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी नाथ भक्तांची गर्दी होत आहे. अनेक नाथभक्त कानिफनाथ चरणी रोख आणि मौल्यवान वस्तू अर्पण करत आहेत. सुरक्षिततेच्या कारणामुळे विश्वस्त मंडळाने या वस्तू वितळवून त्या सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अध्यक्ष सचिन मरकड, कोषाध्यक्ष पवार, विश्वस्त अॅड. विजयकुमार वेल्दे यांनी पंचांसमक्ष आणि व्हिडिओ चित्रण करत अलंकार वितळविले आहेत. यातून २५ किलो चांदीची वीट, २५ तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट अन् ५ तोळ्याचा मुकुट तयार करून सुरक्षित स्थळी ठेवले आहेत. देवस्थानच्यावतीने विविध विकास कामे हाती घेण्यात आले असून यात भक्तांच्या दर्शनबारीसाठी जोडपूल, सावलीसाठी शेड आणि मंदिर परिसराची रंगरंगोटी सुरू आहे. या ठिकाणी भविष्यातील गरजा लक्षात घेता यात्रा आराखडा व गडाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अध्यक्ष मरकड यांनी दिली. (प्रतिनिधी)नाथभक्तांच्या इच्छेनुसार सुवर्णकलशाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. आजीवन अन्नदान योजनेसाठी जमा केलेला निधी राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आला असून उर्वरित निधीची मुदत ठेव पावती करण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब पवार यांनी दिली.
‘मढी’ चे अलंकार पंचांसमक्ष वितळविले
By admin | Updated: May 25, 2014 00:32 IST