अहमदनगर : रेमडेसिविरप्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पोलिसांनी महापालिकेला कळविले आहे. पोलिसांचे तसे पत्र मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी बोरगे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याचा ठपका बोरगे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चाैकशीचा एक भाग म्हणून पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठविले आहे. हे पत्र आयुक्तांच्या नावाने आहे. आयुक्तांनी बोरगे यांना चौकशीसाठी पोलिसांत हजर होण्याचे आदेश द्यावेत, अशा आशयाचे हे पत्र आहे. यासंदर्भात आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. केडगावच्या खासगी रुग्णालयातील रुग्णांना जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविर उपलब्ध करून देण्यात आले होते; परंतु संबंधित रुग्णांना ते मिळाले नव्हते. त्यामुळे रुग्णांनी सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे तक्रार केली. याबाबत सातपुते यांनी महापालिकेच्या जुन्या कार्यालयात येऊन चौकशी केली असता ते रेमडेसिविर बोरगे यांच्याकडे आढळून आले. दरम्यान, पोलीसही जुन्या मनपा कार्यालयात दाखल झाले होते; परंतु पोलिसांना तिथे काहीही आढळून आले नाही. मात्र, सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रेमडेसिविरचा काळा बाजार केल्याचा आरोप बोरगे यांच्यावर केला गेला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले होते; परंतु पोलिसांनी आता याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून, वैद्यकीय आरोग्य अधिकारी बोरगे यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत कळविले आहे.
लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून बोरगे यांनी दालनातच वाढदिवस साजरा केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, अशा अशायची नोटीस आयुक्त शंकर गोरे यांनी आरोग्य अधिकारी बोरगे यांना शनिवारी बजावली. याबाबत २४ तासांत खुलासा करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. आयुक्तांनी नोटीस बजावून तीन दिवस उलटले. मात्र, बोरगे यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही. रमडेसिविर आणि त्यानंतर वाढदिवस प्रकरण, यामुळे आयुक्त बोरगे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
....
वैद्यकीय आरोग्य अधिकारी बदलाच्या हालचालींना वेग
बोरगे यांच्यावरील आरोपांमुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त गोरे यांच्याकडून याबाबत चाचपणी सुरू केली आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार कुणाकडे सोपवायचा याविषयी आयुक्तांनी दोन्ही उपायुक्तांशी चर्चा केल्याचे समजते.