अहमदनगर : साखर सम्राट अथवा कुठल्याही प्रस्थापित नेत्याकडून देणग्या न घेता बहुजन क्रांती मोर्चासाठी सर्वसामान्यांकडून मदतनिधी जमा करण्याचा निर्णय या मोर्चाच्या संयोजकांनी घेतला आहे. शांततामय मार्गाने निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व जनताच करणार असून पीडित कुटुंबियांंच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती संयोजकांनी सोमवारी दिली. जिल्ह्यात सोमवारी हा मोर्चा निघणार आहे. बहुजन समाजातील विविध ५२ संघटनांचा त्यात सहभाग असणार आहे. माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विजय वाकचौरे, प्रा. किसन चव्हाण, अप्पासाहेब गायकवाड, सुधाकर रोहम, अॅड. अरुण जाधव, राजेंद्र बुधवंत, अशोक सोनवणे, सुरेश बनसोडे, दत्ता जाधव, बाबासाहेब गाडळकर, अनंत लोखंडे, सुनील क्षेत्रे, अजय साळवे, सुमित गायकवाड, संजय खामकर, बाळासाहेब आव्हाड, बाबा सानप आदी नेत्यांनी शहरात सोमवारी भरगच्च पत्रकार परिषद घेतली. आपल्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाजही जागा झाला़ बहुजनांचे राज्यभर स्वतंत्र मोर्चे निघू लागले आहेत़ नाशिकमध्ये ओबीसींचा, तर नांदेडमध्ये दलितांचा मोर्चा निघाला़ परंतु नगर जिल्ह्यात सर्व बहुजन समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन एकच मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तालुकानिहाय बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन सुरु आहे. नगरसह राज्यभरातून लाखो समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत़ वाडिया पार्क येथून निघणाऱ्या मोर्चासाठी पाच हजार स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत़ जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने वाहने येणार आहेत़ त्यासाठी स्वतंत्र वाहनतळांचीही निर्मिती करण्यात येणार आहे़ वाहनतळावरून मोर्चेकरी पायी वाडिया पार्क येथे येतील़ हा मोर्चा मूक नाही असे संयोजन समितीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बहुजन क्रांती मोर्चाला नेत्यांचा पैसा नको
By admin | Updated: October 18, 2016 00:19 IST