अहमदनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, हिंद सेवा मंडळ व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहाच्या वास्तूत केशव माधव मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण भारतमाता प्रतिमेच्या पूजनाने झाले. या कोविड सेंटरमध्ये ३०० जणांची व्यवस्था होणार आहे.
सोमवारी सकाळी या कोविड सेंटरचे लोकार्पण झाले. यावेळी महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, प्रांत संघचालक नानासाहेव जाधव, जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, संचालक मधुसूदन सारडा, डॉ. पारस कोठारी, ॲड. सुधीर झरकर, भैय्या गंधे, रवींद्र बारस्कर, सेंटरचे प्रमुख राजेश परदेशी, रणजीत श्रीगोड, श्रीकांत जोशी, जिल्हा कार्यवाह डॉ. मनोहर देशपांडे, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी आदी उपस्थित होते.
यावेळी नानासाहेब जाधव म्हणाले, गेल्या वर्षापासून कोरोना काळात पूर्ण देशात संघाचे सेवा कार्य सुरू आहे. समाजाला कशा स्वरुपाची मदत पाहिजे आहे हे ओळखून संघ सेवा कार्य करीत आहे. नगरमध्येही पुण्याच्या धर्तीवर कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहाची वास्तू कोविड सेंटरसाठी देऊन हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेने सर्वात मोठी मदत करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. महापालिकेचीही मोठी मदत यासाठी झाली आहे. या कोविड केअर सेंटरमधून रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी परतावा यासाठी मोफत सर्व चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा तेव्हा संघ समाजाच्या मदतीला धावून जातो. सध्याच्या परिस्थितीत मोफत कोविड केअर सेंटर सुरू केल्याने मोठे कार्य उभे राहिले आहे. अशा अनेक उपक्रमांना महापालिकेचे कायम सहकार्य राहील.
प्रास्ताविकात हिराकांत रामदासी म्हणाले, कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोफत निवास, भोजन व इतर सुविधा मिळणार आहेत. रुग्णांकडून व्यायाम, प्राणायाम करून घेण्याबरोबरच व मानसिक स्वास्थ्यासाठी धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंटरचे सहप्रमुख पी. डी. कुलकर्णी यांनी केले. प्रमुख राजेश परदेशी यांनी आभार मानले.
--------------------
फोटो- ०३ केशव माधव कोविड सेंटर
रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहाच्या वास्तूत सुरू करण्यात आलेल्या केशव– माधव मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण सोमवारी झाले. यावेळी प्रांत संघचालक नानासाहेव जाधव, आयुक्त शंकर गोरे, डॉ. रवींद्र साताळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, राजेश परदेशी आदी उपस्थित होते.