अहमदनगर : निघोज (ता. पारनेर) येथील सरपंचपदाच्या निवडीवेळी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित दोन सदस्यांच्या अपहरण प्रकरणातील दहा आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आरोपींनी जामीन अर्ज मागे घेतला. यापूर्वी या आरोपींना तात्पुरता जामीन देण्यात आला होता. आरोपींनी केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.
पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतीत फेब्रुवारी २०२१मध्ये सरपंचपदाची निवडणूक होती. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर भागाजी लाळगे, गणेश दत्तू कवाद यांचे मतदानाच्या दोन दिवस अगोदर गावातीलच विरोधी गटातील गुंड प्रवृतीच्या साधारण वीस जणांच्या टोळक्याने खेड परिसरातील सूर्यकांत खानावळ येथून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यांना मतदानापासून वंचित ठेवले होते व ग्रामपंचायतीची सत्ता मिळविली होती, अशी फिर्याद विठ्ठल भाऊसाहेब कवाद यांनी खेड (जि. पुणे) पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. यातील अपहरण करण्यात आलेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी सुटकेनंतर खेड पोलिसांकडे जबाब नोंदविला होता.
या प्रकरणात आरोपींना खोट्या पद्धतीने, राजकीय आकसातून गुंतविल्याचा युक्तिवाद आरोपींचे वकील नितीन गवारे यांनी केला.
सरपंच निवडीच्या कागदपत्रांवरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळच्या पत्नीची सध्या सरपंचपदी निवड झाली आहे. यामुळे आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असण्याची खात्री आहे. त्यामुळे आरोपींना अटकेपासून दिलासा देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील वाय. एम. नाकवा व फिर्यादीचे वकील रूचिता दुरू यांनी न्यायालयासमोर केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, तपासासाठी आरोपींना कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भरत भोसले यांनी केली. जामीन फेटाळल्यामुळे आता यातील सर्व आरोपींना तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा करतेवेळी वापरलेली साधने, वाहने, हत्यारे व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला जाईल.
---
सखोल तपास व्हावा...
सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने सर्व आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा. मुख्य आरोपींशिवाय त्यांना मदत करणारे आणखी दहा ते पंधरा सहआरोपी आहेत, अशी माहिती फिर्यादी विठ्ठल कवाद, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, गणेश कवाद यांनी दिली.
----
...यांना नाकारला जामीन
निघोज ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ यांच्यासह सुनील वराळ, नीलेश घोडे, अजय वराळ, राहुल वराळ, स्वप्नील दुनगुले, सुभाष वराळ, आकाश वराळ, धोंडिभाऊ जाधव यांना न्यायालयाने जामीन नाकारला आहे, असे खेड पोलिसांनी सांगितले.