शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीने सुरु असलेल्या शिर्डीतील एकशे सहाव्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता रविवारी (दि़१३) दुपारी माधवराव आजेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली़ त्यानंतर माध्यान्ह आरती करण्यात आली़ या आरतीस देशभरातील लाखो भाविकांनी हजेरी लावली़उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी गुरुस्थान मंदिरात संस्थानचे कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे यांनी सपत्नीक रुद्राभिषेक पूजा केली तर समाधी मंदिरातही उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब सोनवणे यांनी सपत्नीक पाद्यपूजा केली़ या उत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली़गुरुपौर्णिमा उत्सवात तीनही दिवस भाविकांच्या देणगीतून मोफत अन्नदान करण्यात आले़ या प्रसादाचा जवळपास दोन लाख भाविकांनी लाभ घेतला़ तर दर्शनरांगेतही अडीच लाख लाडू प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले़ उत्सवात मंदिर व परिसरात फुलांची सजावट करणारे बंगलोर येथील साईभक्त सुब्रामणी राजू व प्रसाद बाबू, विद्युत रोषणाई करणारे मुंबई येथील साईराज डेकोरेटर्सच्या संचालकांचा रविवारी संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला़ तसेच रात्री साडेसात ते साडेदहा या वेळेत विश्वनाथ ओझा, श्रीरामपूर यांच्या साई मिलन की आस या कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली़ यंदा वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित झाल्याने मोठी गर्दी होऊनही नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक सुरळीत होती़ (तालुका प्रतिनिधी)
काल्याच्या कीर्तनाने गुरुपौर्णिमेची सांगता
By admin | Updated: July 14, 2014 00:58 IST