जामखेड : माझं शहर स्वच्छ सुंदर असावं, ही संवेदना नागरिकांत असणे गरजेचे आहे. आ. रोहित पवार यांनी नदी खोलीकरण व सुशोभीकरण तसेच शहर स्वच्छ होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु येथील नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे, अशी खंत सुनंदा पवार यांनी व्यक्त करून नागरिकांनी अभियानात सहभाग होऊन स्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन केले.
येथील रमेश गिरमे सभागृहात स्वच्छता अभियानसंदर्भात सुनंदा पवार यांनी नागरिक, पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेतली. पवार म्हणाल्या, जामखेडपेक्षा कर्जतचा स्वच्छता सर्वेक्षणातील सहभाग उल्लेखनीय आहे. तेथे नागरिक श्रमदान करतात. पवार कुटुंबीयांनी यामध्ये झोकून दिले आहे. जामखेडमध्ये तसा प्रयत्न केला; परंतु नागरिक स्वेच्छेने बाहेर पडत नाहीत. माझं शहर स्वच्छ, सुंदर असावं, अशी जाणीव नागरिकांत व्हायला हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
शासकीय कार्यालयांच्या सर्व इमारतींना एकच रंग असावा, असा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे शहरातील भिंती ‘बोलक्या’ करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तीस लाखांचा रंग नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी ७० बाकडे, सार्वजनिक ठिकाणी कचरा व अन्य साहित्य टाकण्यासाठी ६२ डस्टबिन तसेच दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, महावितरण अभियंता विलास कासलीवाल, नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ ढवळे, मयूर भोसले आदी उपस्थित होते.
...........
आपलं शहर स्वच्छ व सुंदर असावं, ही मानसिकता प्रत्येक नागरिकाची असावी. एन. सी. सी. व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिशन म्हणून या कामात स्वतःला झोकून द्यावे. सर्वांनी एकजुटीने सातत्य ठेवून सहभाग नोंदविला तर निश्चितपणे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर होईल. स्पर्धेत आपला पहिल्या पाच शहरांमध्ये समावेश होईल.
-सुनंदा पवार, सामाजिक कार्यकर्त्या