शिर्डी : नाट्यमय घडामोडीनंतर गुरुवारी अनिता विजय जगताप यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली़ जगताप या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे गटाच्या कट्टर समर्थक आणि काँग्रेसच्या गटनेत्या. त्यांनी अर्ज मात्र राष्ट्रवादी-सेना-भाजपा या महाआघाडीकडून दाखल करत विखे गटालाच धक्का दिला. आज अन्य स्पर्धकांनी माघार घेतल्यानंतर जगताप यांच्या विजयावर महाआघाडी आणि काँग्रेस या दोघांनीही दावा ठोकला. त्यामुळे शिर्डीचे राजकारण नव्याच वळणावर पोहोचले आहे. सोबतच नव्या वादालाही तोंड फुटले आहे. नगराध्यक्षपदासाठी जगताप यांच्यासह, भाजपाचे राजेंद्र गोंदकर, तर काँग्रेसच्या सविता ताराचंद कोते व प्रयागाबाई ज्ञानेश्वर गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते़ गुरुवारी भाजपाचे गोंदकर, तसेच काँग्रेसच्या कोते व प्रयागाबाई गोंदकर यांनी अर्ज मागे घेतल्याने अनिता जगताप यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला़ मात्र तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसच्याच असलेल्या जगताप यांचा विजय कोणाचा यावरून नवा वाद सुरू झाला आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, जगताप या काँग्रेसच्या गटनेत्या आहेत़ त्यांनी महाआघाडी कडून अर्ज भरला तरी त्या काँग्रेसच्याच आहेत. आपण काँग्रेसच्याच असून आपल्याला मतदान करावे, अशी विनंती जगताप यांनी केल्याने आम्ही दोन्हीही अर्ज मागे घेतले़ काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी असल्याने उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नीलेश कोते यांचीही बिनविरोध निवड करणार आहोत़ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे, राजेंद्र कोते, ताराचंद कोते, गोपीनाथ गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, उत्तम कोते तसेच अनिता जगताप यांचे दीर राजेंद्र जगताप पत्रकार परिषदेला उपस्थित होते़ त्यांनीही कैलास कोते यांच्या दाव्याला पुष्टी दिली. (तालुका प्रतिनिधी)काँग्रेसच्या या दाव्यावर भाजपाने मात्र तीव्र आक्षेप घेतला. भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर म्हणाले, विरोधकांकडून साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब होवूनही राष्ट्रवादी-भाजपा-सेनेचे नगरसेवक अनिता जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले़ पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांनी जगताप यांना पाठिंबा दिला़ विखे यांची शिर्डीतील सत्ता संपुष्टात आली आहे़ सूचक-अनुमोदक आमचेच असल्याने त्या आमच्याच पाठिंब्यावर निवडून आल्याचा दावाही गोंदकर यांनी केला़ यावेळी बाबूराव पुरोहित, नितीन कापसे, धनंजय शेळके आदी उपस्थित होते़ दरम्यान जगताप यांनी आपण राष्ट्रवादी - सेना- भाजपाच्या पाठबळावर निवडून आल्याचे स्पष्ट केले,तर काँग्रेसने त्या विरोधकांच्या ताब्यात असल्याने दबावाखाली बोलत असल्याचा दावा केला.
शिर्डी नगराध्यक्षपदी जगताप बिनविरोध
By admin | Updated: July 18, 2014 01:44 IST