अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी काही जागावरून संभ्रम कायम आहे. यात नगरशहर मतदारसंघाचा समावेश आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून स्थानिक आणि बाहेरचा याची स्पर्धा अद्यापही संपलेली दिसत नाही. विधानसभा निवडणुकीचे वारे जोर पकडू लागले आहे. १७४ मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती सुरू झाल्या आहेत. नगर शहर मतदारसंघातून अर्जाव्दारे उमेदवारी मागितलेल्या सहा इच्छकांना २० तारखेला मुलाखतीसाठी मुंबईत बोलविण्यात आले आहे. दरम्यान, शहरजिल्हा काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बाहेरचा उमेदवार दिला जाऊ नये, असा ठराव केलेला आहे. त्यांच्या त्या ठरावावर ते आजही ठाम आहेत. काँग्रेसमध्ये स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार असा संघर्ष सुरू असताना गेल्या आठवड्यात उमेदवारीच्या रेसमध्ये असणारे सत्यजित तांबे यांनी शहर जिल्हा काँग्रेस समितीत जाऊन स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. या चर्चेमुळे शहर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष संपला असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. पक्षाने शहरातून स्थानिक उमेदवार द्यावा. बाहेरचा उमेदवार दिल्यास फायदा होणार नाही, या मतावर पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कायम आहेत. ( प्रतिनिधी) शहर मतदारसंघ काँग्रेसचा असून तो काँग्रेसकडे राहणार आहे. यामुळेच उमेदवारीसाठी अर्ज दिलेल्या सहा इच्छुकांना मुंबईत बोलविण्यात आले असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी दिली. आॅनलाईन पध्दतीने कोणत्या इच्छुकांनी अर्ज दिले याचा तपशील आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इच्छुकांच्या बुधवारी मुंबईत मुलाखती
By admin | Updated: August 17, 2014 23:32 IST