श्रीरामपूर : कोरोना काळात पोलिसांची समाजातील प्रतिमा अधिक उजळली असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी केले. मानवता सेवाभावी संस्था व पोलीस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांच्या बक्षीस वितरणप्रसंगी रविवारी येथे आले असता पाटील बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, सुरेश वाबळे, कामगारनेते अविनाश आपटे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘कोरोना काळात कायद्याच्या अंमलबजावणी कामी सतर्क रहावे लागत असल्यामुळे पोलिसांना प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागली. सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती; मात्र समाजाने त्यास चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा अधिक उजळली. स्वच्छता कर्मचारी व डॉक्टरांनी कोरोना काळात मोलाचे कार्य केले.’
क्रिकेट खेळामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण राहत नाही. भिवंडी येथे काम करत असताना तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरुणांशी संपर्क वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार तेथे तरुणांसोबत क्रिकेटच्या माध्यमातून स्नेह वाढविला. त्यामुळे सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी मोठा लाभ झाला, असे मनोज पाटील यांनी सांगितले.