श्रीगोंदा : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाजप खासदारांना कांदे मारतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला.
शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व. शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त श्रीगोंदा फॅक्टरी येथे नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या.
घनवट म्हणाले, कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्यानंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली. साठ्यांवर मर्यादा घातली. परदेशातून आयात केली. व्यापाऱ्यांवर छापे टाकून कांद्याचे दर पाडले. केंद्र शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारीपासून कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिसतील तेथे भाजप खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी दिवसा वीजपुरवठा, ऊसदर, दूधदर, वन्यप्राण्यांचा त्रास, साखर कारखान्यातील काटामारी, साखर उतारा चोरी, बाजार समित्यांमधील लूट, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.