अहमदनगर : खाजगी रुग्णालये हायटेक झाली आहेत़ सरकारी रुग्णालयांचा कारभार अद्यापही चिठ्ठीवरच सुरू आहे़ मात्र पुढील महिन्यांत जिल्हा रुग्णालयांसह आरोग्य उपकेंद्रांचा कारभार आॅनलाईन होणार आहे. रुग्णांना दिला जाणारा केस पेपर आणि औषधांच्या पावत्या रुग्णालयातून हद्दपार होणार आहेत़ राष्ट्रीय प्रसारण सूचना विभागाकडून जिल्ह्यांतील बहुतांश सेवा आॅनलाईन आहेत़ आॅनलॉईन सेवांमुळे कार्यालयांतील कारभाराला गती मिळाली आहे़ जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांचा कारभार आॅनलाईन झाला आहे़ इतर कार्यालयांचा कारभार आॅनलाईन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्रयत्न सुरू आहेत़ जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यात २३ ग्रामीण रुग्णालये आणि दोन उप जिल्हा रुग्णालये आहेत़ ही रुग्णालये आॅनलाईन करण्यात येणार आहेत़ त्यासाठी शासनाने एका संस्थेची नियुक्ती केली आहे़ ही संस्था आॅनलाईन सेवांबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल़ प्रशिक्षणानंतर पुढील महिन्यात शासकीय रुग्णालयांचा कारभार आॅनलाईन होणार आहे़ रुग्णांची नोंदणी, औषधे आणि गोळ्यांची नोंदणी आॅनलाईन होईल. याशिवाय विविध तपासण्यांच्या नोंदीदेखील आॅनलाईन घेण्यात येणार आहे.शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आॅनलाईन नोंदणी होणार आहे़ त्यामुळे उपचारासाठीच्या फाईलींची कटकट दूर होणार आहे़ तसेच कुठल्या रुग्णालयात दिवसभरात किती रुग्ण उपचारासाठी आले, त्यांच्यावर काय उपचार झाले, त्यांना दिले जाणारे औषध, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल़आजारांचीही माहिती मिळणार असल्याने त्यावर जनजागृती करणे शक्य होणार आहे.सध्या ई- औषध योजना रुग्णालयात उपलब्ध आहे़ मात्र इतर सेवा आॅनलाईन नाहीत़ त्या आॅनलाईन करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत़रुग्णांना दिला जाणारा केसपेपर आणि गोळ्यांची माहिती आॅनलाईन झाल्यास त्याचा फायदा होईल़-एस़ एम़ सोनवणे,जिल्हा शल्य चिकित्सक
सरकारी रुग्णालये आॅनलाईन
By admin | Updated: March 4, 2016 00:02 IST