पिंपळगाव माळवी : ग्रामपंचायत निवडणूक ही लोकशाहीचा पाया आहे. गावातील शांततेचे वातावरण विकासाला पोषक असते. त्यामुळे निवडणूक काळात ग्रामस्थांनी शांतता राखून आचारसंहिता व प्रशासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. नगर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पिंपळगाव माळवी येथे होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी विशेष काळजी घ्यावी व कायदा, सुव्यवस्था बिघडण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. यावेळी माजी सरपंच संतोष झिने, मेजर विश्वनाथ गुंड, पत्रकार खासेराव साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस पिंपळगाव माळवीचे सरपंच सुभाष झिने, डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब झिने, तंटामुक्ती अध्यक्ष सकाहारी रणसिंग, अजय गुंड, गोरख आढाव, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय शेळके आदी उपस्थित होते.
.............
फोटो ओळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मोहन बोरसे.