रुईछत्तीसी : नगर-करमाळा-सोलापूर (टेंभूर्णी) महामार्गाचे भाग्य अखेर उजळणार आहे. या रस्त्याच्या कामाला नवीन वर्षी सुरुवात होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या मार्गाचा प्रश्न मार्गी लागल्याने वाहन चालक, प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हे काम दोन टप्प्यांत होणार आहे.
या महामार्गासाठी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. तसेच या रस्त्यासाठी नगर, कर्जत तालुक्यात अनेकदा आंदोलने झाली. अनेक वेळा निवेदनही देण्यात आले. या रस्त्याचे काम दोन ठेकेदार कंपन्यांना केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांचे करारनामा, बँक गॅरंटी या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी ३ ते ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत भूसंपादन ९० टक्के होऊन जमिनीवर ताबा मिळविला जाणार आहे. काम सुरू करण्यासाठी ९० टक्के भूसंपादन असणे गरजेचे असते. नगर ते घोगरगाव ३९ किलोमीटर लांबीचा टप्पा जीएचव्ही या कंपनीला, तर घोगरगाव ते चापडगाव असा ४१ किलोमीटर लांबीचा टप्पा अनिश इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आला आहे. एकूण ८० किलोमीटर रस्त्याचे काम नवीन वर्षात सुरू होणार आहे.
--नगर तालुक्यातील भूसंपादन रखडले..
श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नगर तालुका हद्दीतील भूसंपादन रखडले आहे. यासाठी प्रांत कार्यालयाकडून त्वरित हालचाली होणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाकडून भूसंपादन कामास गती मिळणे गरजेचे आहे.
---
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. नव्या वर्षात या मार्गावरील कामास प्रारंभ होऊन वाहतूक सुरळीत आणि सुलभ होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत भूसंपादन पूर्ण करून किमान ९० टक्के जमिनीवर ताबा मिळविला जाणार आहे.
- पी. बी. दिवाण,
परियोजना निदेशक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
--
१७ करमाळा रोड
नगर-सोलापूर रस्त्याची रुई परिसरात सुरू असलेली दुरुस्ती.