अहमदनगर : बँकेचे कर्ज, सावकाराचा कर्जफेडीसाठीचा तगादा त्यातच दुष्काळाचे ओझे, तरीही विठ्ठलाच्या भेटीची आस असेलेला एक शेतकरी धुळे जिल्ह्यातून पंढरपूरला निघाला खरा मात्र या शेतकऱ्याला आषाढी वारीसह आपली जीवन ‘वारी’ही अर्ध्यावरच सोडावी लागली. नगर तालुक्यातील देहरे येथे एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक शेतकरी शुक्रवारी रात्री आढळला़ तो मृतदेह होता धनराज खंडू महाले (वय ५२, रा़ दुसाणे, ता. साक्री, जि. धुळे) या शेतकरी असलेल्या वारकऱ्याचा़महाले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल एवढीच जेमतेम शेती आहे. शेती करता करता ते हरिनामात नेहमीच तल्लीन असायचे. रोज पहाटे उठून चार-पाच वारकऱ्यांसमवेत हरिनामाचा गजर करत गावातून प्रभात फेरी काढायचे. भजनी मंडळात ते सर्वात पुढे असायचे. गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की ते त्यामध्ये भाग घ्यायचे.हाती पडेल ती कामे करून आपली सेवा पांडुरंगाचरणी अर्पण करायचे. धनराज यांच्यामागे पत्नी, चार मुली, दोन लहान मुले असा परिवार आहे. मुलींची लग्नं झाली असून मुले शाळेत शिकत आहेत. दुष्काळी स्थितीमुळे शेतात यंदा काहीच पीक आले नव्हते. त्यामुळे घरसंसार चालविण्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले. ते वेळेवर फेडता न आल्याने खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे कर्ज फेडता येत नसल्याने धनराज नेहमीच चिंतेत असायचे.मागील वर्षांपासून धनराज हे लिमकामी ते पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंडीत जायचे. यावर्षीही ते उत्साहाने दिंडीत आले, मात्र डोक्यावर कर्जाचे ओझे घेऊन. त्यामुळे हरिनामातही त्यांचे लक्ष लागायचे नाही. शुक्रवारी रात्री नगर तालुक्यातील देहरे येथे दिंडी मुक्कामाला आली होती. यावेळी धनराज हे अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता दिंडीतील वाकऱ्यांनाही दिसायची. देहरे येथील रस्त्याच्या कडेला करंजीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली, असे दिंडीतील वारकऱ्यांनी सांगितले़ आत्महत्या केल्यानंतर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस कर्मचारी अनंत गायकवाड यांनी पंचनामा केला. दरम्यान मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्याचा पार्थीव देह दुसाणे येथे पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)दिंडीवर शोककळाधनराज यांच्या आत्महत्येमुळे दिंडीवर शोककळा पसरली. अनेकांची पावले थबकली. वारकऱ्यांनी अन्न-पाण्यालाही स्पर्श केला नाही. दिंडीमध्ये दुसाणे गावातील ५० वारकरी सहभागी झाले होते. ह.भ. प. संजय महाराज भंडारी हे या दिंडीचे चालक आहेत. घटनेची माहिती मिळताच तेही जिल्हा रुग्णालयात धावले.
शेतकऱ्याची जीवन ‘वारी’ अर्ध्यावरच!
By admin | Updated: June 29, 2014 00:30 IST