लोकमत न्यूज नेटवर्क
पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी भाजपचे एक शिष्टमंडळ नुकतेच राळेगणसिद्धी येथे येऊन गेले. पाटील यांच्या गटाचे शिष्टमंडळ येऊन गेल्यानंतर गुरुवारी पुन्हा भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गटाचे माजी मंत्री गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला आले. त्यामुळे या भेटीने भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील गटबाजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारला सातत्याने पत्र पाठवले आहे. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाने कोणतेही उत्तर हजारे यांना पाठवले नाही. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी अंतिम उपोषण दिल्लीत करण्याचे पत्र पाठवल्यानंतर भाजपचे केंदीय नेतृत्व खडबडून जागे झाले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर चर्चा करून विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व खा. भागवत कराड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुनील थोरात यांना पाठवले. त्यांनी अण्णा हजारे यांना कृषी कायद्याची मराठी प्रत दिली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर फोनवरून संवादही करून दिला. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील भाजपचे प्रमुख नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवल्याचे दिसते.
अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर खा. कराड, हरिभाऊ बागडे यांचा पंतप्रधान कार्यालयाबरोबर संपर्क सुरू आहे. त्यातून अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये, यासाठी मनधरणी सुरू असतानाच फडणवीस गटाचे महाजन यांनी तातडीने हजारे यांची स्वतंत्र भेट घेतली. अण्णांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर बोलतील, असे सांगून फडणवीस यांच्या गटाची बाजू महाजन यांनी मांडली. यातून भाजपची गटबाजी उघड झाली आहे.
.........
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीमध्ये भाजप नेत्यांमध्ये गटबाजी नाही. अण्णा हजारे यांच्या प्रश्नांविषयी प्रदेश व केंद्रीय नेतृत्व गंभीर असल्याने नेते भेटी घेत असतील.
-भानुदास बेरड, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप, नगर