टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यात मुळा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. महसूल, पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. हा उपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी होत आहे. टाकळी ढोकेश्वर परिसरातील वासुंदे चौकातून खुलेआम वाळू वाहतूक सुरू आहे.
पोखरी, देसवडे, मांडवे, पळशी, तास, वनकुटे परिसरातील मुळा नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसूल, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरील गावांमधून अवैध वाळू उपसा केल्यानंतर पुणे, नगर, ठाणे, नाशिक जिल्ह्यांत वाळू पाठविली जाते. यासाठी स्थानिक काही जणांची मदत मिळत आहे. सततच्या वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांचीही दैना होत आहे. त्यामुळे स्थानिकांनाही खड्डयांच्या रस्त्यांमधून वाट शोधावी लागत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते दुरस्त केल्यानंतरही तत्काळ खराब होतात. त्यामुळे वाहन चालक व स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---
ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात सर्व कर्मचारी कामात होते. त्यामुळे वाळू माफियांनी फायदा घेतला. आता पथक चालू केले आहे. सध्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
-घनश्याम बळप,
पोलीस निरीक्षक, पारनेर
------
वाळू वाहतुकीच्या वाहनांचा वेगही अधिक..
वाळू वाहतूक करणारी डंपर, ट्रॅक्टरसह इतर वाहने वेगात असतात. त्यामुळे अरुंद रस्त्यांवर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पोलीस, महसूल प्रशासनाने अशा वाहनांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो : ०३ टाकळी ढोकेश्वर
टाकळी-ढोकेश्वर परिसरातील वासुंदे चौकातून डंपरच्या साहाय्याने सुरू असलेली वाळू वाहतूक.