देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ढवळेवस्ती शेजारील गायरान जमिनीवर असणारा कृषी सौरऊर्जा प्रकल्प आगीपासून वाचविण्यात कर्मचारी व ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले. हा प्रकार मंगळवारी घडला.
५० एकर क्षेत्रावर हा आठ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे. येथून हिंगणी सबस्टेशनला विद्युत पुरवठा केला जातो. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास किरण गायकवाड सिक्युरिटी गार्ड यांनी देवदैठण सौरऊर्जा प्रकल्पाच्या पश्चिमेकडील चिंचदरा, तरडे मळा या ठिकाणच्या डोंगरावरील गवताला आग लागल्याचे पाहिले. आग वेगाने सौरऊर्जा प्रकल्पाकडे येत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखत त्वरित सहकारी प्रमोद बनकर व कैलास ढवळे यांना बोलावून घेतले.
वाळलेले गवत, डोंगराळ भाग व वाऱ्याचा प्रचंड वेग यामुळे आग काही वेळात सौरऊर्जा प्रकल्पाच्या कंपाैंडच्या आत प्रवेश केला. गवताचा व मोकळा भाग असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. तत्पूर्वी किरण गायकवाड यांनी सहकारी मेजर रामचंद्र वाघमारे यांना फोन करून माहिती दिली.
ग्रामपंचायत सदस्य नीलेश गायकवाड, सुखदेव गायकवाड, दिगंबर रायकर, राजेंद्र गायकवाड, ओंकार गायकवाड, प्रणव गायकवाड, प्रणव रायकर, सतीश ढवळे, राजेश बनकर, संजय ढवळे, रामचंद्र वाघमारे यांनीही माती, झाडाच्या फांद्या व फायर उपकरणाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. आग सौर प्लेटच्या जवळ पोहोचली असती तर वायर व सौर प्लेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. सर्वांच्या मेहनतीने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
----
फोटो आहे
260521\1617-img-20210525-wa0040.jpg
देवदैठण येथील ५० एकर क्षेत्रावरील सौर उर्जा प्रकप्लाजवळ गवताची आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असताना .