अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूकीचा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मात्र दहा दिवसांचा कालावधी उलटूनही निवडणूकीची तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे सभापतींची निवडणूक लांबली असून, सभापती निवडीचे घोडे कुठे आडले, याची चर्चा सध्या सदस्यांमध्ये सुरू आहे.
महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्य असतात. निम्मे सदस्य एक वर्षांनी निवृत्त होतात. उर्वरित आठ जण दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यानुसार स्थायी समितीचे आठ सदस्य १ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. नवीन आठ सदस्य नियुक्त न करता आठ सदस्यांवरच समिती चालविण्यावर पदाधिकाऱ्यांचा भर असतो. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मात्र १० फेब्रुवारी रोजी सभा घेऊन सदस्यांची नेमणूक केली. तसा ठरावही त्यांनी नगरसचिव कार्यालयाकडे सपूर्त केला. परंतु, विभागीय आयुक्त कार्यालाकडून याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. अद्याप जाहीर केला गेला नाही. सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्याविरोधात अजून तरी कोणी दंड थोपटलेले नाहीत. घुले आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक आहेत. स्थायी समितीत सेना व राष्ट्रवादीचे समान संख्याबळ आहे. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. तसेच भाजपचे चार सदस्य आहेत. परंतु, या दोन्ही पक्षांतून अजून तरी कुणी इच्छुक केलेली नाही. पण, सभापती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्याने इच्छुकांना मोर्चे बांधणीसाठी वेळ मिळाला असून, काहींजण इच्छाही व्यक्त करत आहत. त्यामुळे निवडणूकीचा कार्यक्रम लांबल्यास घुले यांच्या अडचणी वाढू शकतात, असेही बोलले जाते.
...
महापालिकेतील सेनेचा विरोध मावळला
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र सेना व राष्ट्रवादीचा सूर जुळलेला नाही. मागील सभापती पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीविरोधात सेनेने भूमिका घेतली होती. सेनेचे योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी अर्ज मागे घेतला. यावेळी मात्र सेनेत शांतता आहे. त्यांच्याकडून सभापती होण्याची इच्छाही कुणी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे सेनेचा विरोध यावेळी मावळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.