राहाता तालुक्यातील दाढ बुद्रूक येथील दिव्यांग गिर्यारोहक चैतन्य विश्वास कुलकर्णी यांचा २०१४ साली नारळाच्या झाडावरून अपघात होऊन दोन्ही पायाला अपंगत्व आले आहे. तरीही खडतर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर व्यायामाचा सराव करत तीन वेळा महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर व हिमालयात बर्फातील असलेले नेगी ड्युग शिखर आणि आता लिंगाणा शिखराला गवसणी घातली.
चैतन्य यांनी लिंगाणा ट्रेक करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लीडर एडवेंचरला भेट दिली. परंतु चैतन्याच्या पायाची परिस्थिती बघून व चैतन्याच्या पायांचा शून्य टक्के बॅलेंस बघून लीडर नकार देत असत. परंतु बारामती येथील अनिल वाघ, अमोल बोरकर व संदीप कसबे यांनी आशेचा किरण दाखवत लिंगाणा सर करण्यासाठी होकार दिला. अनिल वाघ, जॉकी साळुंखे, चेतन बेंडकुळे, अजय बोंबले यांच्यासमवेत चैतन्यला लिंगाणा सर करण्यासाठी चर्चा करून लिंगाणा सर करण्यासाठी मदत करण्याचे ठरविले. १२ फेब्रुवारी २०२१ ला सकाळी चार वाजता या सुळक्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी सुरुवात केली. व त्याला अखेर दुपारी दोन वाजेपर्यंत चालत बसत व रांगत खडतर अशी बोराट्याची नाळ सर करण्यात यश आले. त्यानंतर त्यादिवशी पायथ्याला मुक्काम करून १३ तारखेला सकाळी लवकर उठून पाच तासात म्हणजेच सात ते बारा वाजेपर्यंत लिंगाणा शिखराची गुहा सर करण्यात यश आले. गुहा सर केल्यानंतर आपल्या भारताचा तिरंगा फडकवून उत्सव साजरा केला आहे.
….………..
सर्वांनाच यातून प्रेरणा मिळावी यासाठी हा प्रवास होता. या कामी अनेकांनी मदत केली. त्यामुळे सर्वांनीच पाठिंबा देऊन प्रवास सुखकर केला. भविष्यात आणखी प्लॅन आहेत.
-चैतन्य कुलकर्णी
०९ चैतन्य कुलकर्णी