------------
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड सेंटर, ग्रामीण भागात उपकेंद्रावर तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेण्यात आलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहा ते सात महिन्यांचे मानधन मिळाले आहे. केवळ संगमनेर, पाथर्डी आणि श्रीरामपूर येथील काही कर्मचाऱ्यांचे मानधन तांत्रिक त्रुटीअभावी रखडले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांना मानासह धनही मिळाले आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा कमी पडली आणि या यंत्रणेच्या मदतीला कंत्राटी कर्मचारी धावले. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वाॅर्ड बॉय, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्निशियन यांचा समावेश होता.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीवरच जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रुग्णांचा मृतदेह पीपीई किटमध्ये पॅक करण्याचे कामही या कर्मचाऱ्यांना करावे लागले. कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ जाण्यासही कोणी धजावत नव्हते. अशा वेळी कायम कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र, संसर्ग कमी झाल्यानंतर काही कोविड सेंटर बंद झाले. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्यापही कमी करण्यात आलेले नाही. तसेच त्यांना मानधनही दिले जात असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्येनंतर उर्वरित कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
--------------
बजेट मिळविण्यासाठी पाठपुरावा
कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी बजेट उपलब्ध झाले नव्हते. जिल्ह्यात ग्रामीण भागात सातशे आणि शहरी भागात तीनशे-चारशे अशा एकूण ११०० च्या वर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी प्रत्येक महिन्याला मोठा खर्च होता. त्याला निधीच नसल्याने त्यांचे मानधन रखडण्याच्या बेतात होते. मात्र, आरोग्य यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मानधन देण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून घेतला.
-----------
तीन तालुक्यांतील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी बजेट उपलब्ध नव्हते. त्यामुळे एनआरएचएमच्या इतर बजेटमधून कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले. ११ तालुक्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले. पाथर्डी, श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र क्षीरसागर यांनीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली होती.
------------
मानधनावर घेतलेले कर्मचारी - ७००
सध्या कामावर असलेले कर्मचारी - ७००
किती कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा - १० ते २०
कोविड केअर सेंटरची संख्या - १४५
--------------
पहिल्या लाटेत चार महिने आणि दुसऱ्या लाटेत तीन महिने असे सात महिने आम्ही काम केले. सध्या कोविड सेंटर बंद आहेत. रुग्णही कमी झालेले आहेत. मात्र, आमच्या कंत्राटी पद्धतीने केलेल्या नियुक्त्याही खंडित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जून-जुलै महिन्यांचेही मानधन मिळणार आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा नगरची परिस्थिती चांगली आहे.
-एक कंत्राटी कर्मचारी
----------------
जिल्ह्यात ५५५ आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यामध्ये ३९७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली होती. सर्वांचे सहा ते सात महिन्यांचे मानधन अदा करण्यात आलेले आहे. पाथर्डी, श्रीरामपूर या दोनच तालुक्यांतील काही कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले होते. ते देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. इतर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याचे राहिलेले नाही.
-राजेंद्र क्षीरसागर, सीईओ, जिल्हा परिषद
---------