अहमदनगर : मुकुंदनगरमधील एकही रस्ता धड नाही. पावसाचे पाणी साचून गटार झालेल्या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करावी लागते. मागणी करूनही महापालिका रस्ते दुरूस्त करत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेसमोर निदर्शने केली. उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांना एक किलोमीटर पायी चिखलातून फिरवत रस्त्यांची परिस्थिती दाखविण्याचे अभिनव आंदोलन नागरिकांनी केले. दोन-तीन दिवसात रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन बेहेरे यांनी नागरिकांना दिले. मुकुंदनगरमध्ये फेज टू योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली. पाईपलाईन खोदताना निघालेली माती रस्त्याकडेला होती. पावसाने ती रस्त्यावर आली. मातीचा चिखल रस्त्यावर पसरला. त्यामुळे सगळ्या मुकुंदनगरमध्ये दलदल झाली. जागोजागी पाण्याचे डबके साठले आहे. शहरातील अन्य उपनगरातील रस्त्यांची कामे तातडीने होतात, मुकुंदनगरमधील कामे मात्र होत नाहीत असा आरोप करत साहिल सय्यद, अमीर शेख, मुआज शेख, फरीद शेख, समीर खान, अरबाज शेख, कदीर शेख यांच्यासह शंभरावर नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. पालिकेच्या प्रवेशद्वारसमोर निदर्शने केली. त्यानंतर उपायुक्त बेहेरे आंदोलकांना सामोरे गेले. प्रत्यक्ष पाहणीसाठी चला, या नागरिकांच्या आग्रहाखातर ते निघाले. मात्र नागरिकांनी त्यांना वाहनात बसण्यास मज्जाव करत पायी नेले. चिखलाने दलदल झालेल्या रस्त्यावरून उपायुक्त बेहेरे यांना फिरविण्यात आले. रस्त्यावर ड्रेनेजच्या उघड्या असलेल्या एका झाकणाला त्यांच्यासमक्ष नागरिकांनी फुलांचा हार घालत गांधीगिरी केली. चिखलातून फिरवत नेल्यानंतर तेथेच नागरिकांनी त्यांना रस्ता दुरूस्त करणाऱ्या मागणीचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)
उपायुक्तांना चिखलातून फिरविले
By admin | Updated: July 31, 2014 00:40 IST