जामखेड : रुग्णांच्या शेजारी असलेले मृतदेह लवकर हलवावेत तसेच पक्के बिल द्यावे, अशी मागणी केल्याच्या रागातून नगर येथील पॅसिफिक कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरसह पाच कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद आकाश भागवत डोके (वय २६) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली. यावरून नगर येथील डॉक्टरसह पाचजणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर येथील पॅसिफिक कोविड केअर सेंटरमध्ये ल. ना. हौसिंग विद्यालयाचे प्राध्यापक भागवत सुपेकर हे उपचार घेत होते. त्यावेळी आकाश डोके व संजीव जाधव सुपेकर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुपेकर हे खूप घाबरलेले होते. त्यांच्या आजूबाजूला ३ ते ४ मृतदेह अनेक तासांपासून पडून होते. ते मृतदेह हलविण्याची विनंती डोके यांनी कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना केली. मात्र, त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे डोके यांनी तेथील प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. रविवार असल्याने कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नव्हते. त्यामुळे सुपेकर यांचा मृत्यू झाला. त्यांना २ लाख ६५ हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. त्यावेळी डोके म्हणाले, रीतसर बिल भरण्यास तयार आहे. परंतु, जास्त बिल भरण्यास नाही. पक्के बिल द्या. असे म्हटल्याचा राग आल्याने डॉ. प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बालकृष्ण पाटील, यश पोळ, बलराज पाटील यांनी मारहाण केली. गेटमधून मारहाण करत हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील रूममध्ये डांबून ठेवले, असे डोके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी डॉ. प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बालकृष्ण पाटील, यश पोळ, बलराज पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.