अहमदनगर : कोरोना संकटात जिवाची बाजी लावून जे फ्रंटलाइन वर्कर काम करत आहेत, असे कोरोना योद्धे आरोग्य कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पगाराविना आहेत. मे महिना उजाडला तरी आरोग्य विभागातील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचा पगार मिळालेला नाही.
उपाशीपोटी युद्ध जिंकता येत नाही, असं म्हणतात. परंतु हे आरोग्य कर्मचारी कोणतीही तक्रार न करता प्रामाणिकपणे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वर्ग १ आणि २ चे ३०० वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका, आरोग्यसेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, सफाई कामगार, असे सुमारे तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील हे कर्मचारी ग्रामीण आरोग्याचा भार वाहतात. सध्या कोरोनाची महामारी सुरू असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात त्याचा संसर्ग झालेला आहे. अशा स्थितीत नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांना कोरोनाची लक्षणे आहेत का याचे सर्वेक्षण करणे, कोरोनाची लक्षणे असतील तर अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांची तपासणी करणे, त्यांच्यावर औषधोपचार करणे, कोरोना लसीकरण, अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करणे अशी कोरोनासंबंधी सर्व कामे ही कर्मचारी रात्रंदिवस करत आहेत. याशिवाय नेहमीचे बालकांचे लसीकरण, महिलांच्या प्रसूती, तसेच इतर आजारांच्या रुग्णांवरील उपचार ही कामेही दैनंदिन सुरू आहेत. जीव धोक्यात घालून हे कर्मचारी लढत असताना दुसरीकडे शासनाने या कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. मार्च महिन्याचा पगार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणे गरजेचे असताना एप्रिल महिना संपला तरी पगार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. कर्जांचे हप्ते, इतर देणी, तसेच दैनंदिन खर्च भागवताना या कर्मचाऱ्यांना ओढाताण करावी लागत आहे. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्च महिन्यातील पगार झालेले आहेत, मात्र वर्ग तीन आणि वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेली नाहीत.
-----------
निधीअभावी पगार रखडले
शासनाकडून निधी न आल्याने पगार रखडले असल्याचे आरोग्य विभागाकडून समजते. सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी दर महिन्याला नऊ ते दहा कोटी रुपये लागतात. ही मागणी आरोग्य विभागाकडून आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे, मात्र अद्याप कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत.
-------------
वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे मार्चचे पगार अद्याप झालेले नाहीत. त्याबाबतची मागणी उपसंचालक कार्यालयाकडे नोंदवलेली आहे.
-डॉ. दादासाहेब साळुंके, उप जिल्हा आरोग्य अधिकारी