कर्जत : शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कर्जत येथे केले.
कर्जत येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक एकत्र येत सलग दोन महिन्यांपासून श्रमदान करीत स्वच्छता अभियान राबवत आहेत. या श्रमदात्यांची राजेंद्र भोसले यांनी कर्जत येथील तहसील कार्यालयात भेट घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
आशिष बोरा यांनी स्वच्छ कर्जत अभियानाची सविस्तर माहिती दिली. तहसीलदार, बीडीओ, शहराला लाभलेले सीईओ या अधिकाऱ्यांचे कौतुक करीत हे सर्व जण श्रमदानात सहभागी होत असल्याने लोकांचा उत्साह वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. माजी अधिकारी अनिल तोरडमल म्हणाले, या उपक्रमासाठी काही मदत करता आली, तर या चळवळीला फायदा होईल. विशाल म्हेत्रे, नितीन देशमुख यांनी शहरातील धुळीच्या प्रश्नावर उपाययोजना झाल्यास व्यावसायिकांचा प्रश्न सुटेल, असे म्हटले. डॉ. दयानंद पवार यांनी आरोग्याबाबत प्रशासनाने लक्ष वेधले. काकासाहेब काकडे यांनी या अभियानात अद्याप अडचणी आल्याच नसल्याचे म्हटले.
यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, बहिरोबावाडीचे सरपंच काकासाहेब तोरडमल, भाऊसाहेब रानमाळ, अक्षय राऊत, घनश्याम नाळे, फारुक बेग, राहुल नवले, वरद म्हेत्रे, भास्कर भैलुमे, विनोद बोरा, कालिदास शिंदे, अशोक नेवसे, रामेश्वर शर्मा, समशेर शेख, नितीन तोरडमल, निरंजन काळे, राहुल खराडे, बापू गायकवाड, आशिष शेटे, प्रसाद शहा आदींची उपस्थिती होते.