शेवगाव : शहरासह तालुक्यात वाढलेले अवैध व्यवसाय रोखण्याचे आव्हान नव्याने पोलीस निरीक्षकपदाचा पदभार घेतलेल्या प्रभाकर पाटील यांच्यापुढे आहे. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने शेवगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत ५५ जणांना ताब्यात घेत ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे ही प्रतिमा सुधारण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या बदलीनंतर पंधरा दिवसाने प्रभाकर पाटील यांची रिक्तपदी नियुक्ती झाली. बदली आदेश मिळताच त्यांनी तत्काळ पदभार स्विकारल. दरम्यानच्या काळात अवैध व्यवसायिकांना रानमोकळे सापडल्याने त्यांनी हातपाय पसरले आहेत. तालुक्यात ठीकठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू असताना याकडे स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष आहे. अवैध दारू विक्री, मटका, अवैध गौण खनिज, गुटखा, वाळू चोरी जोरात सुरू आहे. वाळूचोरांनी उच्छाद मांडला आहे. महसूल विभागाच्या पथकावर दगडफेक करण्याइतपत त्यांची मजल गेली आहे.
तालुक्यातील अनेक गावात महिलांनी ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव संमत करून घेतला असतानाही आजूबाजूच्या गावातून गावठी दारू आणून विक्री केली जात आहे. लपूनछपून सुरू असलेल्या या धंद्याला आळा घालण्यात पोलीस यंत्रणा निष्फळ ठरली आहे. नव्याने रूजू झालेले विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कारवाई करताना वाळू चारी करणारे वाहन जप्त केली. शेवगाव, पाथर्डी तालुक्याच्या हद्दीत १३ जुगार अड्ड्यांवर छापे मारले. दोन ठिकाणी अवैद्य दारूनिर्मिती करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. एकीकडे वरिष्ठ अधिकारी धडाकेबाज कारवाई करून पोलीस खात्याची प्रतिमा उंचावत असताना त्यांना स्थानिक कर्मचाऱ्यांची साथ मिळणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.