अहमदनगर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी (दि.१८) नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. यामुळे भाजपामध्ये चैतन्य संचारलेअसून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षातील इच्छुकांच्या प्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर प्रथमच गडकरी नगरला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची भाजपाने जय्यत तयारी केली आहे. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता त्यांचे नगरला आगमन होणार आहे. बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ््याचे सुशोभीकरण कामाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरातही ते दर्शन घेणार आहेत. ११.४० वाजता नेप्ती रोड येथील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर भाळवणी येथे ११.५५ वाजता ते कल्याण-विशाखापट्टणम् या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर भाळवणीतच पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पाणी परिषदेनंतर गडकरी दुपारी दीड वाजता पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.गडकरी यांच्या दौऱ्याने पक्षात चैतन्य संचारले असून सर्व कार्यक्रमाची सूत्रे खासदार दिलीप गांधी यांनी स्वत:कडे घेतली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचे नेते गडकरी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या मुलाखतीसाठी अन्य पक्षातील इच्छुकांची गर्दी झाली होती. त्यामुळे गडकरी यांच्या दौऱ्यात कोणाचे प्रवेश होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.(प्रतिनिधी)
गडकरींच्या दौऱ्याने भाजपात चैतन्य
By admin | Updated: August 17, 2014 00:02 IST