अहमदनगर : केडगाव येथील डीएसके शोरूममध्ये रोखपाल म्हणून काम करणाऱ्या नीलेश भीमा डेरे (रा.पाडळी आळे, ता. पारनेर) याने ३० लाख ८८ हजार ५०८ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी शोरूमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रोखपाल डेरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर-पुणे रोडवरील केडगावजवळ चार चाकी वाहनांची विक्री व दुरुस्ती करणारे डीएसके शोरूम आहे. या शोरूममध्ये निलेश डेरे हे रोखपाल (कॅशिअर) म्हणून काम करीत होते. शोरूमच्या कामकाजाचे १ एप्रिल २०१४ रोजी आॅडिट झाले. यावेळी शोरूमच्या व्यवहारात ३४ लाख, ३४ हजार ६३६ रुपयांची अफरातफर झाल्याचे लक्षात आले. शोरूमचे पुणे येथील वरिष्ठ अधिकारी सुनील रंगनाथ म्हंकाळे (रा. नारायण पेठ, पुणे) यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे कसून चौकशी केली असता अनेकांचा त्यामध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. यावेळी त्यांनी काही कर्मचाऱ्यांकडून धनादेश लिहून घेतले, काही कर्मचाऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतले. रोखपाल डेरे यांनी पैसे परत देण्यास मुदत मागितली होती. मात्र दिलेल्या मुदतीत पैसे न दिल्याने म्हंकाळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. डेरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे तपास करीत आहेत.
रोखपालाने केला ३० लाखांचा अपहार
By admin | Updated: July 18, 2014 01:44 IST