अहमदनगर : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील तलाठी उत्तम निवृत्ती दळवी याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सापळा लावला. तलाठी दळवी याने तक्रारदार यांचे वडिलोपार्जित विहिरीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी व भावाने विकलेल्या शेतीची नोंदीवर हरकत घेण्यासाठी ५ जुलै रोजी २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार आणि तलाठ्यांमध्ये १५ हजारांवर तडजोड झाली. त्यानंतर गुरुवारी सकाळी तलाठी दळवी याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारले. पोलीस उपअधीक्षक ए.आर. देवरे, पोलीस निरीक्षक विजय मुतडक, वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, प्रमोद जरे, सुनील पवार, नितीन दराडे, राजेंद्र सावंत, अंबादास हुलगे यांच्या पथकाने सापळा लावून दळवी याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़ दळवी याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
लाचखोर तलाठी अटकेत
By admin | Updated: August 8, 2014 00:17 IST