अहमदनगर: आघाडी सरकारने बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १४ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र अद्याप एक छदामही आला नाही़ त्यांचे हे पैसे गेले कुठे? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या वतीने शहरातील उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे धरले़उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले़शहरातील सक्कर चौक ते कोठी हा बहुचर्चित उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्याचे मजबुतीकरण करण्याच्या मागणीसाठी सेनेचे आ़ अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यात धरणे आंदोलन करण्यात आले़ शहरातील उड्डाणपुलाचे छायाचित्र असलेला बोर्ड आंदोलनस्थळी लावण्यात आला होता़ मुख्य इमारतीसमोरच आंदोलने होत असतात़ मात्र सेनेने इमारतीच्या तळमजल्यात जिल्हा नियोजनच्या प्रवेशव्दारासमोर धरणे धरले़ कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्याविरोधात जोदार घोषणाबाजी केली़ आ़ राठोड म्हणाले, सक्कर चौक ते कोठीपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी होते़ नागरिकांना तासनतास त्याठिकाणी थांबावे लागते़ पुणे महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत़ त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले़ विकासकाने पूल बांधून द्यावा, अशी अट आहे़ मात्र संबंधिताने पूल केला नाही़ काम पूर्ण न करताच टोल वसुली सुरू आहे़ काम करत नसेल तर टोल बंद करा, अशी मागणी राठोड यांनी यावेळी केली़ आंदोलनात भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल बोरुडे, गणेश कवडे, अनिल लोखंडे, सुरेश तिवारी, दत्ता मुदगल, दशरथ शिंदे, दिगंबर ढवण, विजय भांगरे, प्रकाश भागानगरे, रणजित परदेशी, संजय चोपडा आदी सहभागी झाले.
सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे
By admin | Updated: August 8, 2014 00:08 IST