अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यात येणार आहे. विरोधकांनी शांततापूर्ण मार्गाने सभेचे कामकाज पार पाडावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष महादेव गांगर्डे यांनी केले. तर विरोधी गुरूकुल मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या वारेमाप खर्च, गैरव्यवहारावर संचालक गोकुळ कळमकर, ज्ञानेश्वर माळवे आणि राजेंद्र शिंदे यांनी हल्लाबोल चढवला.सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर रविवारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष गांगर्डे बोलत होते. बँकेचे खेळते भागभांडवल ५०६ कोटी असून वसूल भागभांडवल २४ कोटी ६८ लाख रुपये आहेत. बँकेची गुंतवणूक १४८ कोटी असून येणे ३२१ कोटी रुपये आहे. मार्च २०१४ अखेर बँकेला ४८ कोटी ३० लाख रुपयांचा नफा झाला असून १ कोटी ७१ लाखांच्या आवश्यक तरतुदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बँकेकडे ४४६ कोटी १३ लाख रुपयांच्या ठेवी असून गत वर्षीच्या तुलनेत त्यात ५५ कोटी ९३ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे. बँकेचा सीडीरेशो ७० टक्के आवश्यक असतांना तो ९६.५६ टक्क्यांपर्यंत गेल्याने बँकेवर निर्बंध लागले होते. यामुळे विद्यमान संचालक मंडळाला तारेवरची कसरत करत काम करावे लागले. सध्याच्या संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजात काटकसर आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा रजेचा पगार, मेहनताना देणे बंद केलेले आहे. यामुळे बँकेची बचत झाली असल्याचा दावा अध्यक्ष गांगर्डे यांनी केला आहे.संचालक कळमकर यांनी विरोधकांवर टीका करतांना त्यांच्या काळात झालेल्या अतिरिक्त खर्चाचा हिशोब मांडला. तर त्यांच्या काळात बँकेची पतसंस्थेप्रमाणे अवस्था झाली होती. शिंदे यांनी विरोधक विनाकारण तथ्यहीन आरोप करत असल्याचे सांगितले. माळवे यांनी डॉ. कळमकर यांच्यावर टीका केली. उध्दव मरकड यांनी ४५० वस्ती शाळा शिक्षक सदिच्छा मंडळात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. गुरुकु ल मंडळ वगळता अन्य विरोधकांनी संचालक मंडळाच्या चहापानाच्या कार्यक्रमाचा स्वीकार केला असल्याचे अध्यक्ष गांगर्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)संचालकांनी लाटला मोबदलाशिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने अहवालात केंद्रप्रमुखांना १२ लाख रुपये सेवा मोबदल्या पोटी दिले असल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात केंद्रप्रमुखांना यातील एकपैसाही मिळालेला नसल्याचा आरोप शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी केला आहे.सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले की, गत वर्षापासून सभासदांना एक छदामही लाभांश न देणाऱ्या संचालक मंडळाने मात्र कर्मचाऱ्यांच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरण्यासाठी ६० लाख ७८ हजार रुपयांची तरतूद बोनसपोटी केली आहे. एवढ्या रकमेतून सभासदांना ६ टक्के लाभांश देता आला असता. बँकेने प्रत्येक शाखेत सुरक्षेसाठी कॅमेरे बसविलेले असतांना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सुरक्षा रक्षक नेमले आणि त्यावर १३ लाख ७ हजार एवढा खर्च केला. बँकेला बाहेरच्या पेक्षा श्रेष्ठी आणि संचालक मंडळाकडून अधिक धोका असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी सलीम खान पठाण, संजय पवार, बाळू खेडकर, रामप्रसाद आव्हाड, बाळू डमाळे यांनी केली आहे. कोअर बॅँकिगचा खर्च संशयास्पदप्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांनी बँक आधुनिकीकरणाच्या नावाखाली कोअर बँकिंगवर १ कोटी ७६ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च केला आहे. या खर्चावरून संचालक मंडळात वाद निर्माण झाला असून कोअर बँक प्रणाली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कमिशनच्या हव्यासापोटी संचालक मंडळाने अवघ्या ७५ लाख रुपयात होणाऱ्या प्रणालीचा आकडा वाढविला असल्याचा आरोप अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार
By admin | Updated: July 18, 2014 01:44 IST