प्रमोद आहेर, शिर्डीवाहनांवर वापरण्यात येणाऱ्या अंबर, लाल, निळ्या दिव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या गृह विभागाने दिव्यांच्या वापरात बदल करण्याचे काढलेले आदेश पाच महिन्यानंतरही कागदावरच आहेत़आजवर गाडीवर असलेल्या अंबर व लाल दिव्याचा एक वेगळाच रुबाब होता़ तर सेवाभावी असलेला निळा दिवा दुर्लक्षीत होता़ आता जिल्ह्यातील महसूल व पोलीस प्रशासनाला अंबर ऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र निळ्या दिव्याचा प्रभाव पडत नसल्याने अद्यापही अधिकाऱ्यांना अंबर दिव्याचा मोह सुटत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, काही उपअधिक्षक व प्रांताधिकारी वगळता जवळपास बहुतेक वाहनांवर अद्याप पूर्वीचाच दिवा आहे़ यासाठी दिव्याच्या उपलब्धतेचे कारण पुढे करण्यात येत आहे़ श्रीरामपूर तालुका वगळता जवळपास सर्वच पोलीस व तहसीलदारांच्या वाहनांवर अंबर दिवा आहे. निळा दिवा जवळपास दुर्लक्षीतच आहे. काहिंनी दिवा वापरणेच बंद केले आहे. सर्वोच्य न्यायालयाने १० डिसेंबर २०१३ रोजी या संदर्भात आदेश दिल्यानंतर ४ एप्रिल २०१४ रोजी राज्याच्या गृह विभागाने(परिवहन) राज्यात दर्जानुसार दिव्यांच्या प्रकारात व वापरात बदल केले आहेत़दिवा वापरण्याचे निकषलाल दिवा,फ्लॅशर सह- राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मंत्री, विरोधी पक्ष नेता़लाल दिवा,फ्लॅशरविना- विधान परिषदेचे उपसभापती, विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, राज्यमंत्री, मुख्य सचिव, राज्याचे महाअधिवक्ता, निवडणूक आयोगाचे आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त़रुग्णवाहिका- रुग्णास घेऊन जात असताना जांभळ्या काचेमध्ये लुकलुकणारा लाल दिवा़ आपत्कालीन व्यवस्थेत कर्तव्यार्थ वापरली जाणारी वाहने, एस्कॉर्ट, पायलट कार- लाल, निळा, पांढरा असा बहुरंगी दिवा़अंबर दिवा,फ्लॅशरविना- शासनाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अप्पर सचिव पदावरील समकक्ष अधिकारी, पोलीस महासंचालक आणि त्या पदावरील समकक्ष अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक़ याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष, अ व ब वर्ग महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त, विभागीय आयुक्त, मुख्य जिल्हा न्यायाधिश (कार्यक्षेत्रापुरते मर्यादित)़जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला निळा दिवाशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना अंबर दिवा वापरण्यास बंदी घातली आहे़ ज्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर अंबर दिवे असतील, ते त्यांनी काढून टाकावेत आणि निळे दिवे बसवावेत, अशा शासनाच्या सूचना आहेत़ त्यानुसार जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आपल्या वाहनावरील अंबर दिवा काढून त्याजागी निळा दिवा बसविला आहे़ उपप्रदेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्या वाहनावरीलही अंबर दिवा काढण्यात आला असून, निळा दिवा बसविण्यात आला आहे़ जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या वाहनावरील अंबर दिवा काढून निळा बसविण्यात आला आहे़ महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या वाहनावरील अंबर दिवा काढण्यात आला असून, आयुक्तांच्या वाहनावर कुठलाही दिवा नाही़ जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या वाहनावरही दिवा नाही़ शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात येत असून, त्यांनी आपल्या वाहनांवर निळा दिवा बसवून घेतला आहे़
अंबर दिव्यांचा मोह सुटेना...
By admin | Updated: September 3, 2014 23:59 IST