देखाव्यांची रेलचेल : सुंदर देखाव्यांना वैचारिकतेची झालररुपेश उत्तरवार यवतमाळआपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळचा दुर्गोत्सव अगदी एक दिवसावर आला असून, या दुर्गोत्सवासाठी यवतमाळ नगरी सज्ज झाली आहे. शहरातील विविध ठिकाणी सुंदर देखावे साकारले असून, त्यावर कलावंत अखेरचा हात मारत आहे. विविध मंडळांनी साकारलेल्या सुंदर देखाव्यांना यंदा वैचारिकतेची झालर असून, शेतकरी आत्महत्यांसह विविध विषय देखाव्यातून साकारले आहेत. यवतमाळ शहरातील सर्वात जुने दुर्गोत्सव मंडळ म्हणून येथील आठवडी बाजारातील हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाची ओळख आहे. या मंडळाने आपली ७७ वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, मंडपाच्या प्रवेशव्दारावरच वैचारिक प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले आहे. शितला मातेला मध्यरात्री जलाभिषेक करण्यासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे या मंडळाचे संजय त्रिवेदी यांनी सांगितले. शहरातील बालाजी दुर्गोत्सव मंडळ यंदा आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या मंडळाने त्रिलोकपुरी हा देखावा साकारला असून, संपूर्ण परिसरात हिमायलयाची प्रतिकृती तयार केली आहे. कैलास पर्वत, गंगा अवतरण, शिवमहिमा, कृष्णलीला, रामलीला हे देखावे येथे साकारले जात आहे. दीडशे फुट उंच कैलास पर्वत या दुर्गोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. स्थापनेच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत गोंधळीगीत, शिवकालिन संस्कृती, गरबा, भांगडा, राजस्थानचा कालबेलिया, मणिपुरी, दक्षीणेतील कुचीपुडी आणि जयपुरचे नृत्य राहणार आहे. या मंडळाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शिलाई मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवात जन्मास येणाऱ्या कन्यारत्नाला ११ हजार रुपयांची देणगी देण्यात येणार आहे. बेटी बचाओ या विषयावर हे मंडळ विशेष नाटिका सादर करणार आहे. विसर्जन मिरवणुकीत सुप्रसिद्ध विशाल ब्रॉस बँड बोलाविण्यात येणार आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या नेतृत्वात सुवर्ण महोत्सवीवर्ष साजरे होत आहे. यवतमाळ शहरालगतच्या वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुभाष क्रीडा मंडळ यंदा ४९ वर्षे साजरे करीत आहे. या मंडळाने द्रोणागिरी पर्वत साकारला असून, बाहुबली चित्रपटातील धबधबा आणि रामायणातील दृश्य साकारले आहे. दुर्गोत्सव काळात दानपेटीत येणारी संपूर्ण रक्कम शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय लंगोटे यांनी सांगितले. ओम सोसायटी परिसरातील एकवीर दुर्गोत्सव मंडळाने यंदा कमळाच्या आकाराचे मंदिर साकारले असून, नऊ दिवस याठिकाणी गरबा नृत्याचा आस्वाद यवतमाळकरांना घेता येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पांढरकर यांच्या नेतृत्वात दुर्गोत्सव साजरा होत आहे. वडगावातील छत्रपती दुर्गोत्सव मंडळाने सुवर्णकुटी साकारली असून, कोलकाता येथील कलावंतांनी ही कुटी साकारली. रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रितेश देशमुख यांनी सांगितले. आर्णी मार्गावरील वैद्य नगरातील लोकमान्य दुर्गोत्सव मंडळ यंदा स्त्रीजीवनावर आधारित देखावा साकारत आहे. ग्रामीण संस्कृतिची हुबेहुब झलक यातून दिसणार आहे. मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिरासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुबियांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष भैय्या मानकर यांनी सांगितले. छोटी गुजरी परिसरातील एकता दुर्गोत्सव मंडळाने शिशमहल साकारला असून, दीड लाख शिश्यांपासून हा मंडप साकारला आहे. नऊ दिवस याठिकाणी उपवासाचे साहित्य भक्तांना वितरित केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश पातालबन्सी यांनी दिली. गणपती मंदिर परिसरातील नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाने भैरवनाथ दर्शन आणि हनुमान मूर्तीचा देखावा साकारला आहे. अखंड मनोकामना ज्योत हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. येथे नऊही दिवस अन्नदान सुरू राहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राधेशाम निमोदिया यांनी दिली. राणाप्रताप गेट परिसरातील सहकार दुर्गोत्सव मंडळ गुजरात राज्यातील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिर साकारत आहे. तर चांदणी चौकातील नवीन दुर्गोत्सव मंडळाने जय मल्हार हा चलचित्र देखावा साकारला आहे.
दुर्गोत्सवासाठी यवतमाळ नगरी सज्ज
By admin | Updated: October 12, 2015 02:37 IST