नियोजनाचा अभाव : रात्र जागूनही पाणी मिळत नाहीयवतमाळ : यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर व नजीकच्या ग्रामपंचायत परिसरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार या बाबत नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देत आहे. परंतु आता वेळेवर काहीही करणे शक्य होताना दिसत नाही. यवतमाळ शहरातील काही भाग तसेच नजीकच्या उमरसरा, लोहारा, भोसा, मोहा आदी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षात हजारोच्या संख्येने नळजोडण्या प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहे. परंतु त्या तुलनेत नियोजन मात्र प्राधिकरणाकडून करण्यातच आलेले नाही. परिणामी मागणी जास्त आणि साठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून त्याच त्या असलेल्या पाईप लाईन जीर्ण झाल्या आहे. वारंवार पाईप लाईन लिक होत असल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असताना अनेकांना मात्र पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पाईप लाईनची दुरुस्ती करण्यामध्येच आठ-दहा दिवस लागतात. अशावेळी पाणी कोठून आणावे, हा प्रश्न आहेच. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. निळोणा धरणाची साठवण क्षमता जरी चांगली असली तरी गेल्या ४०-४५ वर्षांपासून या धरणातील गाळच काढण्यात न आल्यामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. आता कुठे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा गाळ काढणे सुरू आहे. शहरातील अनेक भागात रात्री २ नंतर कधी तरी नळाला पाणी पोहोचते. तर काही परिसरात तर रात्र जागूनही पाणी मिळत नाही. परिणामी नागरिकांमध्ये चांगलाच रोष दिसून येतो. दिवसभर काम करायचे आणि रात्रभर पाण्यासाठी जागायचे, अशी परिस्थिती सध्या शहरात दिसून येते. अनेक ठिकाणी पाणी वेळेवर सोडल्याच जात नसल्याची तक्रार प्राधिकरणाकडे करण्यात येते. परंतु कोणत्याही तक्रारीची दखल घेण्याच्या मनस्थितीत प्राधिकरण नाही. एकीकडे पाणी न पुरवू शकणाऱ्या प्राधिकरणाचे देयके मात्र वेळेवर दिल्या जातात. त्यामध्ये न दिलेल्या पाण्याचे पैसेही नमूद असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)कंत्राटदारांचा मनमानी कारभारप्रत्येक भागात पाणी सोडण्याची जबाबदारी विविध कंत्राटदारांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सोपविली आहे. त्यातही या कंत्राटदारांनी रोजंदारीवर माणसं नेमली आहे. ही माणसं जबाबदारीने पाणी सोडत नाही. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो.जीवन प्राधिकरणाकडे कोणत्याही बाबीची तक्रार करण्यास नागरिक गेले असता ते केवळ आपली जबाबदारी झटकून कंत्राटदार व इतर रोजंदारांची नावे सांगतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही नागरिकांना अशाच प्रकारची वागणूक मिळते.अनेक भागात आठ-आठ दिवस नळच येत नाही. त्यातही जे पाणी मिळते तेदेखील दूषित असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणीटंचाईचे सावट गडद
By admin | Updated: May 16, 2015 00:14 IST