यवतमाळ : व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी विकासाचे तीन मार्ग आहे. ते म्हणजे नवविचारांचे वैज्ञानिक ज्ञान, व्यवस्था परिवर्तनासाठी सत्ता आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी धन. महात्मा फुलेंच्या विचारातून या तीनही गोष्टींचा समन्वय साधला आहे. म्हणून त्यांचे विचार त्यांच्या साहित्यातून समजून घेतले तर शेतकरी आत्महत्या निश्चित थांबतील असे प्रतिपादन अमरावती येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. सुधीर महाजन यांनी केले. यवतमाळ येथील आझाद मैदानात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वातील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर गोबरे होेते. डॉ. महाजन म्हणाले, संघर्षाची क्षमता शेतकऱ्यांना आनुवांशिकतेने मिळाली आहे. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, पूरक उद्योगधंदे, शिक्षण, पाण्याचा योग्य वापर, नशामुक्त जीवन या अनावश्यक गोष्टींना फाटा दिला तर प्रेरणादायी वातावरण निर्माण होऊ शकते. संधीच्या रूपाने निर्मिक आमच्या जवळ असतो, दगडाच्या रुपाने नाही. घामाच्या सिंचनाने, अत्यंत कष्टाने पिकविलेले धान्य लग्नात अक्षदा म्हणून फेकले जाते. ही कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे. धान्याऐवजी महात्म्याने लग्नात फुले उधळण्याची सूचना केली आहे. बौद्ध समाजाशिवाय इतर समाजाने ही सूचना स्वीकारली नसल्याचे डॉ. महाजन म्हणाले.याच व्याख्यांनांतर्गत दुसऱ्या भागात ‘ओबीसी समाज व फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा’ या विषयावर अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्लीचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी व्याख्यान दिले. ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत. तरीही सर्वजण एका विचारात गुफलेले नाही. प्रत्य जात स्वत:ला श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजत असते. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. त्यामुळे बहुसंख्य असूनही अनेक चळवळी करूनही पदरात फारसे यश पडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात विशाखा काळे या विद्यार्थिनींने ‘मला पडलेले स्वप्न’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. शेवंताबाई गणेश फरतडे या विधवेने कर्जापोटी आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ आहे असा अर्ज स्मृती पर्वाचे आयोजक ज्ञानेश्वर गोबरे यांच्याकडे दिला होता. त्याचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला नगरपरिषद नियोजन सभापती देविदास अराठे, सत्यशोधक समाज अध्यक्ष डॉ. दिलीप घावडे, प्रा. काशिनाथ लाहोरे, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष अॅड़ राजेंद्र महाडोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, सत्यशोधक स्टडी सर्कल उपाध्यक्ष प्रा. सविता हजारे, अशोक तिखे, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मोरे, नाभीक समाज अध्यक्ष संजय मादेश्वार गोपाल कुडमेथे, ओबीसी सेवासंघाचे अध्यक्ष राजेश मुके उपस्थित होते. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
ज्ञान, सत्ता आणि धन विकासाचे तीन मार्ग
By admin | Updated: December 6, 2014 01:59 IST