शिक्षक परिसंघाची मागणी : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनयवतमाळ : शिक्षणाचा बालहक्क कायद्याचा भंग करीत प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर चांदेकर यांनी जिल्हय़ातील शाळांचे सत्र ५ मे पर्यंत वाढविले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी शिक्षक परिसंघाने केली आहे. या संबंधीचे एक निवेदन नुकतेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत रुमाले यांना देण्यात आले. शिक्षणाच्या बालहक्क कायद्यानुसार वर्ग १ ते ५ साठी २00 दिवस तर वर्ग ६ ते ८ साठी २२0 दिवस याप्रमाणे ८00 आणि एक हजार तास शाळा असणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यात आणि अमरावती विभागातही या नियमानुसार १ मे पर्यंत शाळा सुरू होत्या. त्यानंतर मात्र उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या. केवळ यवतमाळ जिल्हय़ात प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर चांदेकर यांनी ५ मे पर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा आदेश काढला. त्यांची ही चूक शिक्षक परिसंघाने लक्षात आणून दिली. त्याची कुठलीही दखल शिक्षणाधिकारी चांदेकर यांनी घेतली नाही. तसेच येथील शिक्षकांना ५ मे पर्यंत शाळा घेणे भाग पाडले. पर्यायाने विद्यार्थ्यांवरही एकप्रकारे अन्यायच झाला. त्यामुळे शिक्षणाधिकारी चांदेकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिक्षक परिसंघाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत रुमाले यांना दिले. निवेदन देतेवेळी शिक्षक परिसंघाचे जिल्हाध्यक्ष एम.के. कोडापे, प्रवीण कंगाले, निळकंठ कुळसंगे, निलध्वज कांबळे, अनिल थूल, प्रमोद कांबळे, राजेश उपगडे, प्रफुल घोडाम, विश्वास अनभोरे, जनबंधू आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षणाधिकारी चांदेकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा
By admin | Updated: May 9, 2014 01:37 IST