यवतमाळ/वणी : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करून हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी वणी शहरात बंद तर यवतमाळात रस्ता रोको करण्यात आला. एक निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यवतमाळ येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात बसस्थानक चौकात रविवारी सकाळी ११ वाजता रस्ता रोको करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. जबाब दो आंदोलनाच्या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा निषेध करून मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी पी.पी. घाडगे, श्रीराम खिरेकर, नामदेव राजगुरे, विनय ठाकरे, अमित सरोदे, प्रा.सुरेश वरभे, ममता भालेराव, दिवाकर नागपुरे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. वणी शहरात डावी आघाडी आणि धर्मनिरपेक्ष पक्षाने शहर बंदचे आवाहन केले होते. रविवारी सकाळी कार्यकर्त्यांनी शहरातून फिरुन दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी चौक, मेन लाईन, डॉ. आंबेडकर चौक, टिळक चौक आदी परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यानंतर शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शंकरराव दानव, दिलीप परचाके, अरुण खामनकर, कुमार मोहरमपुरी, निशा परचाके, दिलीप लांजेवार यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
वणीत बंद, यवतमाळात रास्ता रोको
By admin | Updated: February 23, 2015 00:11 IST