फुलसावंगी : एक वर्षांपासून वनविभागाला हुलकावणी देणारा सराईन सागवान तस्कराला गुरूवारी सकाळी महागाव वन विभागाने सापळा रचून ताब्यात घतले. विजय रामसिंग राठोड (४२) रा. नारळी ता. उमरखेड असे अट्टल सागवान तस्कारचे नाव आहे. तो एक वर्षांपासून वन विभागाच्या तीन गुन्ह्यात हवा होता. गेल्या एक वर्षांपासून महागाव वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याच्या शोधात होते. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. नाईकवाडे, क्षेत्र सहाय्यक एम.के. इंगोले, क्षेत्र सहायक आर.जी. रत्नपारखी, एस.एस. हक, एस.एच. संगई, बी.ए. खान, एस.के. वाघमारे, एस.एस. मडावी, व्ही.आर. सिंगनजुडे, ए.एस.डुकरे, कैलास मोरे, हनवंता चिरंगे व पुंडलिक कर्हे रात्री ९ वाजेपासून अमडापूर जंगलामध्ये दबा धरून बसले होते. याची कुणकुण आरोपीला लागल्याने तो जंगलात तोडलेला माल नेण्यासाठी आला नाही. मात्र गुरूवारी सकाळी ५.३0 वाजता वनविभागाच्या पथकाने त्याला घरून ताब्यात घेतले. त्याने अमडापूर तलावाच्या उत्तर दिशेला एका नालीत लपवून ठेवलेले सागवान दाखविले. ते सागवान जप्त करण्यात आले. विजय रामसिंग राठोड हा जुलै २0१३ मध्ये पैनगंगा अभयारण्यातील नारळी या जंगलात क्रुझर गाडीमध्ये पकडण्यात आलेल्या सागवान तस्करीमध्ये सामील होता. तेव्हापासून तो पसार होता. मागील कित्येक वर्षांपासून अमडापूर, नारळी, शिरपूली, शिरमाळ या जंगलात मोठय़ा प्रमाणात सागवानाची तस्करी सुरू आहे. वन विभागाच्या तपासामध्ये आरोपी विजय राठोड या आरोपीकडून सागवान तस्कराच्या रॅकेटची माहिती मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सागवान तस्कर वनविभागाच्या जाळ्यात
By admin | Updated: May 9, 2014 01:21 IST