यवतमाळ : नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथे वीज अभियंत्यांना कार्यालयात डांबून ठेवणार्या आंदोलकांविरुद्ध भादंवि ३५३ आणि ३०७ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एसईए) ने केली आहे. एसईएतर्फे सहसचिव विवेक राऊत, विभागीय सचिव किशोर गुल्हाने, विभागीय अध्यक्ष ज्योती गुर्जर, माजी सहसचिव प्रकाश कोळसे आदींनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. जितेंद्र राऊत यांच्याकडे नेर शहर कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार गेल्या काही महिन्यांपासून सोपविण्यात आला. त्यामुळे त्यांना वारंवार नेरला जावे लागते. परंतु ८ मे रोजी मांगलादेवी येथील नागरिकांनी भारनियमनासाठी राऊत यांनाच दोषी ठरविले. त्यांच्यासह सहायक अभियंता सतीश कानडे यांना दोन तास कार्यालयात डांबून ठेवण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ एसईएच्या पदाधिकार्यांची सभा पार पडली. त्यात घटनेचा निषेध नोंदविला गेला. गावकर्यांच्या कृतीमुळे अभियंत्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय कामात हस्तक्षेप आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे नोंदविले जावे, अशी मागणी केली. शिवाय यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले. वीज भारनियमनासाठी केवळ अभियंत्यांना जबाबदार धरणे चुकीचे असून अशा घटनांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे, वीज यंत्रणेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सहसचिव विवेक राऊत यांनी ‘लोकमत’कडे नोंदविली. वीज अभियंत्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
मांगलादेवीतील आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवा
By admin | Updated: May 10, 2014 00:32 IST