वेकोलि, अतिक्रमणाची समस्या : तक्रारकर्त्यांची तोबा गर्दी, काही विषयांवर यवतमाळच्या बैठकीत होणार चर्चावणी : पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी वणीत प्रथमच उपविभागीय स्तरावरील जनता दरबार घेतला. नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा सुरू झालेल्या या दरबाराला तक्रारकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे दरबारस्थळी तक्राकर्त्यांसह अनेक अधिकाऱ्यांनाही बसायला जागा मिळणे कठीण झाले होते. या दरबारात वेकोलि, वन जमिनीवरील अतिक्रमण, भूसंपादन, पांदण रस्ते, पुनर्वसन आदी समस्यांचा पाढा वाचण्यात आला.पालकमंत्री संजय राठोड यांचे दुपारी १ वाजताच्या सुमारास वणीत आगमन झाले. त्यांनी प्रथम साई मंदिर चौकातील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला हार्रापण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर ते निळापूरकडे रवाना झाले. तेथे जलयुक्त शिवार योजनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांचा ताफा परत वणीत पोहोचला. हा ताफा महसूल भवनाकडे जाणाऱ्या मार्गावरील तहसील परिसरातच अडविण्यात आला. तेथे दारूबंदी आंदोलकांनी घोषणा देत त्यांना दारूबंदीसाठी साकडे घातले. त्यानंतर ते महसूल भवनात पोहोचले.महसूल भवनात टोकन क्रमांकानुसार त्यांनी तक्रारींचा निपटारा करण्यास सुरूवात केली. यावेळी तेथे प्रचंड गर्दी जमली होती. धड उभे राहायलाही जागा मिळत नव्हती. बबोरगाव येथील नरेंद्र ठोंबरे यांनी वेकोलिने मोबदला न देता शेती संपादित केल्याची तक्रार केली. त्यामुळे बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही. यात शेतकरी भरडला जात असल्याचे सांगितले. मात्र वेकोलि नॉर्थचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने येत्या आठ दिवसांत यवतमाळात बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याचे ठरविण्यात आले. निलजई येथील शेतात जाण्याकरिता रस्ता, मुंगोली येथील पुनर्वसनबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली. वेकोलिच्या भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबत यावेळी पिंपळगाव, बोरगाव, अहेरी आदी गावांतील नागरिकांनी तक्रार केली. वेकोलि विस्थापित गावांचे पुनर्वसन करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या सर्व समस्या आता यवतमाळात बैठक घेऊन निकाली काढण्याची ग्वाही राठोड यांनी दिली. शिंदोला येथील एसीसी सीमेंट कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी संभाजी हनुमंते व ग्रामस्थांनी केली. ही समस्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले. १२0 शेतकऱ्यांना कंपनीने मोबदला देण्याचे निर्देश राठोड यांनी दिले. येनाडी येथील पाणी समस्येवर मात करण्यासाठी एसीसीच्या आराखड्यानुसार कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. प्रभाकर ढवस यांनी महावितरण २0१0 पासून कृषीपंपासाठी वीज जोडणीकरिता अर्ज देऊनही अद्याप वीज न मिळाल्याची तक्रार केली. आता तक्रार दाखल करताच महावितरणने डीमांड भरण्याचे पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. या दिरंगाईबाबत महावितरणच्या संबंधित कर्मचारयाविरुद्ध कारवाई करणग़ाचे निर्देश राठोड यांनी दिले. गुलाब झाडे यांनीही हीच कथा ऐकविली. त्यांची जोडणी आठ दिवसांत करून देण्याचे निर्देशही दिले. विरकुंड येथील ट्रॉन्सफार्मर येत्या १५ दिवसांत बसवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अनेक तक्रारकर्तेही यावेळी उपस्थित नव्हते.निलजई येथील मंजू डंभारे यांनी एमआयडीसी मार्गाच्या बाजूला वणी नगरपरिषद घाण, केरकचरा टाकत असल्याची तक्रार केली. त्यावर हा कचरा नगरपरिषदेचा नसून कुणीतरी रात्री-अपरात्री तो तेथे टाकतात, अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. नगरसेवक व तक्रारकर्त्यांनी त्यांनाच धारेवर धरले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपणही याबाबत तीन महिन्यांपूर्वी निवेदन दिल्याचे सांगितले. कचरा टाकणाऱ्यांची त्वरित फौजदारी तक्रार दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. भीमराव कोराटे यांनी वणीतील अतिक्रण वाढल्ल्याचे सांगून किमान शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली. याबाबत येत्या मंगळवारी बैठक घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश राठोड यांनी दिले. या जनता दरबाराला आमदार संजीवरेड्डी बोदकुवार, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष प्रिया लभाने, सभापती सुधाकर गोरे, उपसभापती रूपलता संजय निखाडे, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वणी, मारेगाव तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)व्यवस्था कोलमडली, पत्रकारांनाही जागा नाहीया जनता दरबाराला सुरू होण्यास प्रथम उशीर झाला. त्यानंतर पूर्ण व्यवस्थाच कोलमडली. महसूल भवनात सर्व पत्रकार उभ्यानेच वार्तांकन करीत होते. मात्र शिवसेना पदाधिकारी स्थानापन्न झाले होते. महसूल भवनात उकाड्यामुळे सर्वच त्रस्त झाले होते. जाणे-येणे करणेही अनेकांना अवघड झाले होते. तक्रारकर्त्यांनाही मंत्र्यांसमोर जाण्यास प्रचंड कसरत करावी लागत होती. येथील ठाणेदार अस्लम खान, शिरपूरचे ठाणेदार मनोज केदारे, सहायक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, पोलीस उपनिरीक्षक दीपक सायरे आदी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. या गर्दीत वृद्ध व महिलांची मात्र चांगलीच फरफट झाली. माजी आमदार चांगलेच भडकलेया जनता दरबाराला वेकोलिचे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. उपस्थित अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावर माजी आमदार विश्वास नांदेकर चांगलेच भडकले. त्यांनी तुम्हाला तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे, त्यांना तसे आश्वस्त करण्याचे अधिकार आहेत काय, अशी पृच्छा केली. त्यावर संबंधित अधिकारी गडबडले. त्यामुळे नांदेकर यांनी वेकोलिच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.दारूबंदी आंदोलनाला दुहीचा पटकापालकमंत्री राठोड यांच्याकडे दारूबंदीची मागणी करण्यासाठी दारूबंदी आंदोलन परिषद आणि स्वामिनी महिला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तहसीलसमोर गोळा झाले होते. प्रथम दारूबंदी आंदोलन परिषदेने त्यांना अडवून समस्या कथन केली. यावेळी प्रचंड घोषणा सुरू होत्या. दुसरीकडे स्वामिनी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या घोषणा देत होत्या. पालकमंत्र्यांनी या दोनही दारूबंदी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र दारूबंदी सारख्या ज्वलंत प्रश्नावरून या आंदोलनाला आता दुहीचा फटका बसण्याची शक्यता उपस्थित वर्तवित होते. केवळ श्रेय मिळविण्याकरिताच तर हे आंदोलन सुरू करण्यात आले नाही ना, अशी शंकाही उपस्थितांमधून व्यक्त होत होती.उकाड्यामुळे वृद्धांची झाली परवडया जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी वणी आणि मारेगाव तालुक्यातील अनेक गावांतील वृद्ध उपस्थित झाले होते. मात्र त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांची परवड झाली. महसूल भवनासमोरील कापडी मंडपात अनेक वृद्ध डोळे मिटून आपला क्रमांक येण्याची प्रतीक्षा करीत होते. उकाड्यामुळे त्यांची प्रचंड फरफट उडाली होती.
पालकमंत्र्यांच्या दरबारात समस्यांचा पाऊस
By admin | Updated: May 16, 2015 00:17 IST