नाफेड केंद्र : दिग्रस तालुक्यातील तीन हजार शेतकरी हवालदिलदिग्रस : बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी नाफेडच्या केंद्रांना पसंती दिली आहे. येथील बाजार समितीच्या आवारात नाफेडने खरेदी केंद्र उघडले. परंतु गत काही दिवसांपासून खरेदी होत नसल्याने सुमारे ४० हजार क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची तूर बेवारस पडून आहे. केवळ बारदाणा नसल्याचे कारण पुढे केल्याने तीन हजार शेतकरी हवालदिल झाले आहे.संपूर्ण जिल्ह्यात तूर खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत आहे. तुरीचे व्यापाऱ्यांचे भाव हमीदरापेक्षाही कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राला पसंती दिली आहे. नाफेड तुरीला पाच हजार ५० रुपये भाव देत आहे. त्यामुळे दिग्रसच्या खरेदी केंद्रावर एकच गर्दी उसळली. या गर्दीवर मात करण्यासाठी बाजार समितीने टोकण पद्धत अवलंबली. तीन हजार शेतकऱ्यांच्या नावांची नोंद करण्यात आली. परंतु दिवसाकाठी केवळ दहा ते १२ टोकण दिले जात असल्याने तीन हजार शेतकऱ्यांचा नंबर केव्हा लागेल, अशी चिंता आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी आपली तूर बाजार समितीच्या आवारात आणली आहे. लिलाव होत नसल्याने तूर बेवारस पडून आहे. बारदाणे नसल्याचे क्षुल्लक कारण करून खरेदीस विलंब लावला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीला बाजार समितीच्या लिलावात चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत अर्धाही भाव मिळत नाही. त्यातच नाफेडने खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. गर्दी पाहून मॉश्चरचे कारण पुढे केले. खरेदी बंद केली. त्यानंतर टोकण पद्धत सुरू करण्यात आली. तीन हजार शेतकऱ्यांनी नावे नोंदविली. आता बारदाणा नाही आणि गोदामात ठेवायला जागा नाही, असे कारण सांगत १४ फेब्रुवारीला ज्यांनी नावे नोंदविली त्यांचीच खरेदी केली जात होती. नाफेडने अशाच पद्धतीने खरेदी सुरू ठेवल्यास तूर केव्हा विकावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात ४० हजार क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.उघड्यावर तूर असल्याने राखणदार ठेवावा लागत आहे. तसेच ताडपत्री भाड्याने आणून झाकावी लागत आहे. समितीत कोणत्याही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाजार समितीला वारंवार शेतकरी याबाबत सांगत आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना झाली नाही. एकंदरीत दिग्रस येथील नाफेडचे केंद्र मुस्कटदाबी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांची नाईलाजाने व्यापाऱ्यांकडे धावबाजार समितीतील नाफेड केंद्रावर विक्रीस लांब रांग असते. त्यामुळे अनेक शेतकरी बाजारात व्यापाऱ्यांना तूर विकण्याच्या मनस्थितीत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शासनही यात कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांच्या घशात जावी, असा शासनाचा उद्देश तर नसावा ना; अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. दिग्रससारखीच अवस्था पुसद, महागाव आणि उमरखेड येथील आहे. शेतकरी तूर विकण्यासाठी बाजार समितीत घेवून येतात. परंतु या ठिकाणी टोकणच्या नावाखाली त्यांना परत पाठविले जाते. एकदा गावावरून घेवून आलेली तूर परत नेणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी बाजार समितीतच तूर ठेवतात. उमरखेडमध्ये खरेदी बंदउमरखेड : तालुक्यात नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. दरम्यान, सोमवारी खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी शिवसेनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तालुक्यात यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. परंतु व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. नाफेडचे खरेदी केंद्र गत १२ दिवसांपासून बंद आहे. स्थानिक खरेदी-विक्री संघाच्या एजंसीमार्फत नाफेडची खरेदी सुरू होती. परंतु ती बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. तत्काळ खरेदी सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवीण पाटील, चितांगराव कदम, कृष्णा पाटील देवसरकर आदींनी केली आहे.
४० हजार क्विंटल तूर उघड्यावर
By admin | Updated: April 11, 2017 00:13 IST