यवतमाळ : नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या सहा नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार ९ नोव्हेंबर रोजी काढले जाणार आहे. या आरक्षणानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. १ नोव्हेंबरला जिल्ह्यातील झरी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि महागाव या सहा नगरपंचायतींसाठी मतदान झाले. २ नोव्हेंबरला त्याची मतमोजणी झाली. राळेगाव व महागावात अनुक्रमे भाजपा व परिवर्तन विकास आघाडीला बहुमत मिळाले. अन्य चार नगरपंचायतींमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. तेथे सेना-भाजपासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीनेही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. अनेक ठिकाणी सेना-राष्ट्रवादी, भाजपा-काँग्रेस अथवा सेना-काँग्रेस आणि भाजपा-राष्ट्रवादी असे समीकरण राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सहा नगरपंचायतींमध्ये तब्बल २३ अपक्ष उमेदवार निवडून आले असून त्यांची भूमिका चार नगरपंचायतीत निर्णायक राहू शकते. नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असले तरी अध्यक्ष कोणत्या संवर्गातील होणार हे अद्याप स्पष्ट नाही. गेली चार-पाच दिवस याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्षपदाचे आरक्षण केव्हा निघणार हे निवडणूक विभागालाही माहीत नव्हते. अखेर गुरुवारी या संबंधीचे आदेश निवडणूक विभागात धडकले. ९ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत अध्यक्षपदाचे आरक्षण काढले जाणार आहे. त्यानंतरच सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षाकडे त्या संवर्गातील उमेदवार आहे काय, हे स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी बहुमत आहे, पण त्या संवर्गातील उमेदवार नाही, अशी स्थितीही एखाद वेळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राळेगावात भाजपाची सत्ता स्थापन होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाची माळ या विजयाचे शिल्पकार आमदार प्रा.डॉ. अशोक उईके कुणाच्या गळ्यात घालतात हे ठरणार आहे. महागावातही परिवर्तन विकास आघाडीला बहुमत असल्याने नगराध्यक्ष त्यांचाच होणार हे उघड आहे. मात्र आरक्षण काय सांगते यावर सर्व काही अवलंबून आहे. कळंब आणि मारेगावात मोठा पक्ष म्हणून सेना सत्तेचा दावा करू शकते. मात्र तेथे त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी चार जागांची गरज भासणार आहे. झरीमध्येसुद्धा भाजपाचीच सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहे. बाभूळगावात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने त्याच पक्षाचा नगराध्यक्ष विराजमान होईल, असे दिसते. मात्र निवडणुकीपूर्वीपासून सोबत असलेली भाजपा-सेना अपक्षांच्या मदतीने सत्तेत बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कळंब, मारेगाव, झरी व बाभूळगाव या तालुक्यात नेमकी कोणाची सत्ता स्थापन होईल, हे सांगणे जरा जिकरीचेच आहे. कारण तेथे युती व आघाडीच्या नेत्यांनी जोडतोड करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालविले आहे. सध्याचे चित्र पाहता सहा पैकी भाजपा-सेनेला प्रत्येकी दोन तर काँग्रेसला एक नगरपरिषद सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे ताब्यात मिळण्याची स्थिती आहे. एका नगर परिषदेत अपक्षांची सत्ता राहील. मात्र यात जोडतोड करून फेरबदल करण्याची तयारीही सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)फुगा फुटला, पक्ष नेत्यांबाबत काय भूमिका घेणार ?४नगरपंचायत निवडणुकीत महागावात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा फुगा फुटला आहे. शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक शिवसेना लढली. मात्र देवसरकरांना महागावकरांनी प्रतिसादच दिला नाही. या पराभवाचे खापर त्यांनी आता जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्यांवर फोडण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ‘अवाजवी हस्तक्षेप’ असे हत्यार पुढे केले आहे. अशीच स्थिती महागावात भाजपाची झाली आहे. केवळ एक जागा भाजपाला मिळाली. राजकीय पक्षांऐवजी गोरगरीब उमेदवारांचा समावेश असलेल्या परिवर्तन विकास आघाडीला मतदारांनी आपली पसंती दर्शविली. ज्यांच्या नेतृत्वात भाजपा-सेना निवडणूक लढली त्यांच्याबाबत पक्ष स्तरावरून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. सेनेकडे खासदार, मंत्रीपद आहे. त्यानंतरही सेनेला कोणत्याच नगरपरिषदेत बहुमत मिळाले नाही. या उलट आमदार अशोक उईके यांनी राळेगावात एकहाती सत्ता मिळविली. भाजपाच्या तुलनेत सेनेला सर्वकाही असूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे राजकीय गोटात बोलले जाते.
नगराध्यक्ष आरक्षण सोडत ९ ला
By admin | Updated: November 6, 2015 03:40 IST