थरार : पुष्पा म्हणते, वाटत होते खड्ड्यात उडी मारून सुरजच्या जवळ जावे!देवानंद पुजारी - फुलसावंगी जीवन आणि मृत्यूमध्ये ४० फुटाची अंधार पोकळी. आतून आई-आई असा आवाज तर बाहेरुन काळजी करू नको, मी आहे रे असे आर्त स्वर. तब्बल १२ तासानंतर सुरज बाहेर आला. पुष्पा व शंकरच्या जीवनात पुन्हा नवा सूर्य उगवला. जीवन प्रकाशमय झाले. मात्र त्या १२ तासात मातृ हृदयाची झालेली घालमेल शब्दातही मांडता येत नाही. पुष्पा एवढेच म्हणते, मलासुद्धा खड्ड्यात उडी मारून सुरजजवळ जावेसे वाटत होते. उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील बोअरवेलच्या खड्ड्यातून सुरज सुखरुप बाहेर आला. सध्या त्याच्यावर फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने सोमवारी सुरजची आई पुष्पा आणि वडील शंकर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांच्यासमोर पुन्हा ते १२ तास जसेच्या तसे उभे राहिले. पुष्पा सांगत होती. दुपारी २ वाजता शेतात जेवण केले. मोठी मुलगी पूजाला सुरजवर लक्ष ठेवायला सांगितले आणि शेतात निंदायला लागले. काही वेळात पूजा धावत आली. बाळ खड्ड्यात पडला अशी ती सांगत होती. क्षणभर विश्वास बसला नाही. खड्ड्याजवळ गेले तर काही दिसत नव्हते. वाकून पाहिले तर केवळ अंधार दिसत होता. तेवढ्यात खड्ड्यातून रडण्यासोबत आई-आई असा आवाज आला आणि शरीरातील त्राणच संपला. पटकन खेड्याशेजारीच बैठक मारली. आतून सुरज बोलत होता. त्याला उसने अवसान आणून धीर देत होते, अशी पुष्पा सांगत होती. काही वेळातच बोअरवेलच्या परिसरात मोठी गर्दी झाली. परंतु सुरजचे बाबा दिसत नव्हते. शंकर एका शेतात कामाला गेला होता. त्याला बोलावून आणले. शंकर धावत आला. त्यावेळी तोंडातून फक्त एवढेच शब्द निघाले, आपला बाळ खाली आहे हो त्याला लवकर काढा. रडण्याशिवाय आम्ही दोघेही काहीच करू शकत नव्हतो. मशीनने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. डोळ्याची पापणीही लवत नव्हती. केवळ डोळ्यातून आसव येत होती. रात्रीच्या अंधारात एकदम टाळ्यांंचा आवाज झाला. कुणी तरी भारत माता की जय असे जोरात म्हटले आणि पाहतो तर काय सुरज माझ्या समोर. सुरजला समोर पाहताच डोळ्यातून आसवंही येत नव्हती. चिखलाने माखलेला सुरज भिरभिरत्या डोळ्याने पाहत होता. त्याला तत्काळ डॉक्टरांनी रुग्णवाहिकीत नेले. आम्हीही धाव गेलो. सुरजला विचारले बाळा तुला कुठे लागले काय असे म्हणत त्याला कुशीत घेतले. सध्या सुरज उपचार घेत आहे. तिने पेढ्यासाठी दिले २० रुपयेसुरज खड्ड्यात पडल्यावर फुलसावंगी येथील करूणा रेणके या महिलेने सुरज सुखरुप बाहेर यावा म्हणून २० रुपयाचे पेढे कबूल केले. ती महिला सोमवारी दवाखान्यात आली. सुरजच्या वडिलांच्या हाती १० रुपयांच्या दोन नोटा देत म्हणाली, या पैशाची पेढे वाटा. सुरजसाठी करूणासोबतच अनेकांनी सुरज सुखरुप बाहेर यावा यासाठी देवाचा धावा केला होता. सुरजच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आता आमदार राजेंद्र नजरधने घेणार असून डॉ.चंदन पांडे यांनी त्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मातेच्या डोळ्यांची १२ तास पापणीही लागली नाही
By admin | Updated: February 2, 2015 23:12 IST