भारी शिवारात शहर पोलिसांची कारवाई
यवतमाळ : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या सशस्त्र टोळक्याला शिताफीने अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून तीन धारदार तलवारी, दोन चाकू असा घातक शस्त्रांचा साठाही जप्त करण्यात आला. ही कारवाई गस्तीवर असलेल्या यवतमाळ शहर पोलीस पथकाने नागपूर मार्गावरील भारी शिवारात शुक्रवारच्या रात्री केली. विलास गोपाळराव सोयाम (२५), मनोज रामूजी विश्वकर्मा (२५), विक्रम भाऊराव राऊत (२५), किरण सुरेश पलांडे (१८), पराग उर्फ चिंटू देवराव कानडे (२०), अमोल जनार्धन मंगळे (१८), दिनेश प्रभाकर गुरनुले (२२), मनोज गणेश कनोजिया (१८) सर्व रा. माळीपुरा आणि हेमंत कांचनलाल राय (४४) रा. बालाजी चौक अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहे. यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रगस्तीत वाढ केली आहे. शुक्रवारी रात्री यवतमाळ शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माळवे, अभय आष्टीकर हे गुन्हेशोध पथकाला सोबत घेऊन गस्त घालीत होते. दरम्यान भारी शिवारात रस्त्याच्या कडेला एक टोळके दडून असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या वेळी प्रसंगावधान राखून पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. या वेळी झडतीत तीन तलवारी, दोन चाकू, दुचाकी (क्र. एमएच-२९-पी-८१४४), पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेदरम्यान टोळक्याने दरोड्याच्या प्रयत्नात होतो, अशी कबुली शहर पोलिसांपुढे दिली. त्यावरून संबंधितांविरुद्ध भादंवि ३९९ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)